Press "Enter" to skip to content

स्वतःचे नाकर्तेपण झाकण्यासाठी पनवेल प्रवाशी संघावर केलेले खोटे दोषारोप सहन केले जाणार नाहीत

प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांचा रोखठोक ईशारा

पनवेल बस स्थानक व पनवेल रेल्वे स्थानकाच्या समस्यांचे निराकारण का झाले नाही याचे उत्तर तीन वेळा आमदार झालेल्या प्रशांत ठाकूरांनीच द्यावे

पनवेल: प्रतिनिधी

          सलग तीन टर्म आमदारकी मिरवून देखील पनवेलकरांच्या रेल्वे आणि एस टी सारख्या मूलभूत समस्यांवर शून्य काम करणारे आमदार ही या शहराची खरी समस्या आहे. प्रवासी संघासारख्या सेवाभावी तत्वावर काम करणाऱ्या संस्थेवर खोटे दोषारोप करून आपले नाकर्तेपण झाकणे हा पनवेलच्या सर्वसामान्य जनतेसाठी सेवाभावी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचाच नव्हे तर तमाम मतदारांचाच अपमान आहे, अशी प्रतिक्रिया पनवेल प्रवासी संघाचे कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली.

           गेली १५ वर्षे पनवेलचे प्रतिनिधित्व करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी आजपर्यंत पनवेल बस डेपोचा प्रश्न मार्गी न लावल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ.भक्तीकुमार दवे (वय ८०), उपाध्यक्ष श्री यशवंत ठाकरे (वय ९०), सचिव श्रीकांत बापट (वय ७८) यासारखी जेष्ठ मंडळी निस्वार्थीपणे प्रवाश्यांच्या समस्यांसाठी मेहनत घेत आहेत. असे असताना प्रवाश्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रवासी संघाच्या पाठीशी उभे राहण्याचे सोडून ते त्यांच्याच वर्तमान पत्राद्वारे प्रवासी संघावर टीका करीत आहेत ही बाब अत्यंत खेदजनक आहे.

         मुळातच पनवेल प्रवासी संघटना ही एक सेवाभावी संघटना आहे. प्रवाशांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ५० हुन अधिक वर्षे संघटना अविरतपणे झटत आहे. असे असतानाही प्रवाश्यांच्या समस्या सोडवण्याबाबत पनवेल प्रवासी संघ मूग गिळून गप्प आहे तसेच एसटी आगाराबाबत प्रवासी संघाने सहा महिन्यापूर्वी आंदोलनाचा फार्स केला. आगाराचे काम सुरू होणे दूरच आगारातील खड्डेही पूर्ण न भरताच याची बोळवण करण्यात आली. त्यामुळे आता यांच्यावर विश्वास न ठेवता प्रवाशांनी स्वत:च रेल्वे पुलाबाबत आवाज उठवणे गरजेचे आहे, अशा प्रकारची प्रवासी संघावर टीका ठाकुरांच्याच दैनिकात होणे ही बाब अत्यंत निंदनीय बाब असल्याचेही यावेळी प्रसार माध्यमांना सांगितले.

           पनवेल प्रवासी संघ काम करीत असताना स्थानिक प्रवाश्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर हे स्वतः संघटनेचा एक भाग होते. त्यांच्याच पक्ष कार्यालयात प्रवासी संघाचे काम चालायचे. मात्र प्रवासी संघाने कात टाकून संघटनेचा विस्तार करण्याचे ठरवून विविध संस्था व राजकीय पक्षातील पदाधिकारी, सदस्यांना सामावून घेण्याचे ठरवल्याने ठाकुरांच्या एकाधिकारशाहीला सुरुंग लागला. त्यामुळे प्रवासी संघापासून आपला राजकीय हेतू साध्य होत नसल्याचे लक्षात येताच व आपण लोकप्रतिनिधी असूनही जनतेला न्याय देऊ शकत नाही या जाणिवेतून त्यांनी संघटनेतून काढता पाय घेतला, अशी टीकाही कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.