लवकरच काढणार भव्य मोर्चा.
वावंजे येथील नामदेव गोंधळी यांची जमीन लाटू पाहणाऱ्यांना बद्दल घडविण्याचा चंग त्यांनी बांधला आहे. यापूर्वी त्यांच्या जमीन खरेदी प्रकरणाबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे प्रकरण माध्यमांसमोर मांडले होते. त्यानंतर तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांनी पुन्हा एकदा माध्यमांचे लक्ष या महत्त्वपूर्ण प्रकरणाकडे खेचायचा प्रयत्न केला. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जमिनीच्या सात बारा उतारे नोंदी जैसे थे झालेल्या असल्या तरी देखील ह्या प्रकरणात नियमबाह्य काम केलेले भूमिलेख अधिकारी, मंडल अधिकारी आणि काही एजंट यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मागणीसाठी नामदेव गोंधळी आता मोर्चा काढण्याची तयारी करत आहेत.
याबाबत त्यांनी कोकण शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार बाळाराम पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे रायगड जिल्हा सल्लागार बबन दादा पाटील, ज्येष्ठ काँग्रेस नेते जी आर पाटील अशा दिग्गजांच्या गाठीभेटी घेतल्या. नियमबाह्य काम करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे यावर एकमत झाल्यानंतर जवळपास सर्व राजकीय पक्षाच्या नेते आणि लोकप्रतिनिधींनी नामदेव गोंधळी यांच्या मोर्चात सहभागी होण्याचे आश्वासन दिले आहे.
नामदेव शंकर गोंधळी यांच्या कुटुंबाच्या मालकीची वावंजे येथे सर्वे क्रमांक 123/2 वर 38.70 गुंठे जमीन आहे. कौटुंबिक वाटणी नुसार दक्षिणेकडील 18.70 गुंठे क्षेत्र त्यांच्या मालकीचे असून उत्तर दिशेकडील 17.70 क्षेत्र त्यांच्या काकांच्या मालकीचे आहे.नामदेव गोंधळी यांनी 20 नोव्हेंबर 2019 रोजी केलेल्या वचन चिठ्ठीनुसार सिद्धार्थ भल्ला यांना त्यांच्या हिश्याची जमीन विकण्याचा निर्णय घेतला.4 लाख 35 हजार रुपये प्रति गुंठा दराने सदरचा व्यवहार ठरला. परंतु सिद्धार्थ भल्ला यांनी सदर जमीन विक्रांत संसारे यांच्या नावाने विकत घेण्याचे निश्चित केल्यामुळे हे खरेदीखत नामदेव गोंधळी आणि विक्रांत संसारे यांच्या दरम्यान नोंदणीकृत करण्यात आले. दरम्यानच्या कालखंडात नामदेव गोंधळे यांना कर्करोगाने ग्रासले. ते कामाला असलेल्या दीपक फर्टिलायझर्स कंपनीतील सहकाऱ्यांनी त्यांना अत्यंत उच्च दर्जाचे वैद्यकीय उपचार मिळवून दिल्यामुळे ते या असाध्य रोगावरती मात करू शकले. त्यानंतर त्यांच्या असे निदर्शनास आले की यादरम्यान खोटे दस्तावेज बनवून सदरच्या खरेदी खतानुसार त्यांच्या काकांची जमीन देखील विक्री केली असे नमूद होते. कुठलाही दोष नसताना विनाकारण कुटुंबात झगडा उभा करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी नामदेव गोंधळी जंग जंग पछाडत आहेत.
वास्तविक सदर जमिनीची पुनरमोजणी करण्याची विनंती देखील गोंधळी यांनी केली होती. सदर जमिनीतील सात एकर जमीन कॉरिडोर प्रकल्पात जाणार असल्याने त्यासाठीच तर हा सारा अट्टाहास केला नाही ना? असा संशय देखील निर्माण होतो. कर्करोग ग्रस्त नामदेव गोंधळी हे जमीन विकल्यानंतर या आजारातून बरे होतील याची शक्यता नाही असे गृहीत धरून कुणा एजंटाने सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरत हा उपद्व्याप केला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गोंधळी यांनी मोर्चाची पत्रके,फलक गावोगावी लावले असून किमान 4 ते 5 हजार ग्रामस्थ मोर्चात सहभागी होतील असे त्यांचे म्हणणे आहे.
Be First to Comment