Press "Enter" to skip to content

पनवेल शहर जिल्हा काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतूला बॅ ए आर अंतुलेंचे नाव द्यावे

सिटी बेल ∆ पनवेल ∆         

देशातील सर्वात लांब शिवडी- न्हावा शेवा सागरी सेतूचे काम ९० टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत या मार्गावर वाहतूक सुरू करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. मुंबई व नवी मुंबईला हाकेच्या अंतरावर जोडण्यासाठी शिवडी ते न्हावा शेवा सागरी पुल अत्यंत महत्वाचा प्रकल्प ठरणार आहे. या अनुषंगाने कोकणचे भाग्यविधाते राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅ. ए.आर.अंतुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी आज (गुरुवार दि.९ फेब्रुवारी) त्यांच्या जयंतीनिमित्त पनवेल शहर जिल्हा काँग्रेसच्यावतीने करण्यात आली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रही देण्यात आले आहे.
         

माजी मुख्यमंत्री बॅ ए.आर.अंतुले यांच्या जयंतीनिमित्त आज (गुरुवार दि.९ फेब्रुवारी) त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बॅ ए आर अंतुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी बॅ ए आर अंतुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवडी- न्हावाशेवा सागरी मार्गाला बॅ ए आर अंतुले यांचे नाव देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याची माहिती पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
           

अरबी समुद्रात २२ किमी लांबीच्या व भारतातील सर्वात मोठ्या पूलाद्वारे दक्षिण मुंबईमधील शिवडी भाग नवी मुंबईसोबत जोडला जाणार आहे. हा मार्ग मुंबई–पुणे द्रुतगतीमार्गासोबत देखील जोडला जाणार आहे. ज्यामुळे पुण्याहून दक्षिण मुंबईकडे वाहतूक देखील सुलभ होणार आहे . तसेच प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ देखील दक्षिण मुंबईहून कमी अंतरात गाठता येणार आहे. सुमारे १७ हजार ८८३ कोटी रुपये खर्च करून २२ किलोमीटर लांबीचा सागरी मार्ग तयार केला जात आहे. यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन मुंबई, ठाणे, रायगड हे जिल्हे एकमेकांना जोडले जाणार आहेत.
         

बॅरिस्टर अंतुले यांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले. भारतातील मोजक्या राजकारण्यांमध्ये आदराने नाव घेतले जायचे असे व्यक्तिमत्व म्हणजे बॅरिस्टर ए.आर.अंतुले. काँग्रेस पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासाठी बॅ अंतुले हे एक ऊर्जास्रोत आहेत. केवळ कोकणच्याच नव्हे तर राज्याच्या विकासात त्यांचा मोलाचा वाटा असल्याने शिवडी- न्हावाशेवा सागरी मार्गाला बॅ ए आर अंतुले यांचे नाव देण्याची मागणी खऱ्या अर्थाने योग्य असल्याची प्रतिक्रिया पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.
       

 रायगड, नवी मुंबईत ओएनजीसी, जेएनपीटी, खाडी पूल यासह विविध महत्वकांक्षी प्रकल्पांची मुहूर्तमेढ बॅ अंतुले यांनी रोवली. यासह मुंबई- उरण व मुंबई- अलिबाग सागरी सेतू व्हावा ही संकल्पना मुळातच बॅ ए आर अंतुले यांनी त्यावेळी मांडली होती. त्यादृष्टीने नियोजनाची सुरुवात देखील झाली होती. आज खऱ्या अर्थाने बॅ अंतुले यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे शिवडी-न्हावा सागरी सेतुला बॅ ए आर अंतुले यांचेच नाव देण्यात यावे. जेणेकरून आज त्यांच्या जयंतीनिमित्त खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल अशी प्रतिक्रिया पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली. 
       

 त्याचबरोबर बॅ ए आर अंतुले यांनी लिहिलेल्या ‘अपॉइंटमेंट ऑफ चीफ जस्टीस’ व ‘महाजन रिपोर्ट अनकव्हर’ या पुस्तकाच्या प्रति छापून शाळांना व महाविद्यालयांना भेट स्वरूपात देणार असल्याचेही अभिजीत पाटील यांनी यावेळी सांगितले. प्रसंगी पनवेल शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सुदाम पाटील, कार्याध्यक्ष अभिजीत पाटील, इंटकच्या रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा विनया पाटील, उद्योजक फुलचंद गुप्ता, हेमंत दवे, विक्रांत पाटील, पराग तेलवणे, विश्वजीत मोरे, नेहा मेहरा, ऍड.अस्मिता जाधव यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.