आजच्या भव्य सभेने रामेश्वर आंग्रे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले : बबनदादा पाटील
सिटी बेल ∆ करंजाडे ∆
येत्या १८ डिसेंबर रोजी पनवेल तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. सर्वत्र प्रचार अंतिम टप्प्यात आलेला असून तालुक्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे वर्चस्व दिसून येत आहे. करंजाडे येथे थेट सरपंच पदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रामेश्वर बबन आंग्रे आणि अकरा सदस्यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार सभेचे आयोजन बुधवार दिनांक १४ डिसेंबर रोजी करण्यात आले होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलेल्या या सभेमध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या तोफा धडाडल्या.
पनवेल उरण महाविकास आघाडीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे प्रवक्ते बबन दादा पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान सदस्य भाई आर सी घरत, शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र पाटील,शेकाप चे माजी पनवेल तालुका चिटणीस नारायण शेठ घरत, पनवेल तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी आदी प्रमुख मान्यवरांच्यासह महाविकास आघाडीचे नेते यावेळी मंचावर उपस्थित होते. करंजाडे सेक्टर ४ येथील टाटा पॉवर केंद्रासमोरील भूखंडावर या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले होते.
बबन दादा पाटील यांनी आपल्या घणाघाती भाषणात महाविकास आघाडीने गरजेपोटी बांधलेल्या घरांना नियमित करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचा पुनरुच्चार केला तसेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे कैवारी असणारे लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठराव केला असल्याचे सांगितले. रामेश्वर आंग्रे यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर येथील जनता आम्हाला पुन्हा निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर आजच्या सभेला असणारी उत्स्फूर्त उपस्थिती याने रामेश्वर आंग्रे यांच्या विजयावर शिक्कामोर्तब केले असल्याचे त्यांनी सांगितले.
आर सी घरत यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या थापेबाज कारभारावर सडकून टीका केली, करंजाडे मध्ये वारंवार पक्ष बदलत नागरिकांशी गद्दारी करणाऱ्या भाजपाच्या नेत्यांवर त्यांनी तोंडसुख घेतले. तर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भाई राजेंद्र पाटील यांनी राष्ट्रसंतांचा, थोर पुरुषांचा अवमान करणाऱ्या भाजपाला तुम्ही मते देणार आहात का? असा परखड सवाल उपस्थित केला.तसेच शेकाप नी ज्या नेत्यांना मोठे केले तेच नेते पक्षाच्या जीवावर उठले असल्याचे सांगितले.अशा दुतोंडी लोकांना धडा शिकवा असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. काँग्रेसचे युवा नेते विक्रांत घरत यांनी रामेश्वर आंग्रे आणि त्यांच्या सदस्य सहकाऱ्यांनी केलेल्या विकास कामांची मुक्तकंठाने प्रशंसा केली तसेच ज्या पंचायती राज व्यवस्थेतून आज ग्रामीण विभागाचा विकास होत आहे ते पंचायती राज अस्तित्वात आणण्याचे खरे श्रेय स्वर्गवासी राजीव गांधी यांना जात असल्याचे सांगितले.
यावेळी मंचावर कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, शिवसेनेच्या पनवेल तालुका महिला आघाडी प्रमुख मेघाताई दमडे, राष्ट्रवादीचे नारायण खर्जे, राजकुमार पाटील संदीप म्हात्रे, पनवेल शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड,काँग्रेस युवानेते विक्रांत घरत, पनवेल अर्बन को-ऑपरेटिव बँकेच्या माजी संचालिका माधुरी गोसावी, कविता मकवाना आदी मान्यवर उपस्थित होते.
शेतकरी कामगार पक्ष,शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस वंचित व बहुजन आघाडी अशा मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे थेट सरपंच पदाचे उमेदवार असणारे रामेश्वर बबन आंग्रे यांची निशाणी कपबशी असून, प्रभाग क्रमांक १ मध्ये अंजना शिवाजी कातकरी यांचे निशाणी गॅस सिलेंडर आणि विद्यमान उपसरपंच योगेंद्र दत्ताराम कैकाडी यांची निशाणी बॅट हे निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक दोन मध्ये अक्षय मोहन गायकवाड निशाणी बॅट, उमेश शंकर भोईर निशाणी पंखा,कोमल रवी खिलारे निशाणी गॅस सिलेंडर असे तीन उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक तीन मधून श्रुती निलेश गायकवाड निशाणी बॅट, नीता योगेश राणे निशाणी गॅस सिलेंडर, रुपेश बबन आंग्रे निशाणी पंखा असे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक चार मध्ये कल्पना विनेश गायकर निशाणी पंखा, नीलम मोहन भगत निशाणी गॅस सिलेंडर, ध्रुव रामचंद्र बोरकर निशाणी बॅट असे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
आमचं काम बोलतय…. आमच्या विरोधकांच्याकडे कुठलाही मुद्दा नाही. अहो इतकच काय ? दाखवण्यासाठी कुठलेही विकास काम नाही म्हणूनच तर आम्ही केलेली विकास कामे त्यांना छापावी लागत आहेत. आम्ही मात्र केलेल्या विकास कामांच्या जोरावरती मते मागत आहोत. पण विरोधकांना मात्र अपप्रचार करण्याची वेळ आली आहे. करंजाडे मधील मतदार अत्यंत सुज्ञ आहे. त्यामुळे कोण प्रचार करतोय आणि कोण अपप्रचार करतोय यातला फरक ते सारेच जण जाणतात.
– रामेश्वर बबन आंग्रे.
Be First to Comment