Press "Enter" to skip to content

रामेश्वर आंग्रे यांच्या प्रचार फेरीला लाभला उत्स्फूर्त प्रतिसाद

करंजाडे मध्ये महाविकास आघाडीच्या घोषणांनी दुमदुमले आसमान

सिटी बेल ∆ करंजाडे ∆ प्रतिनिधी ∆

पनवेल तालुक्यामध्ये येणाऱ्या 18 डिसेंबर रोजी दहा ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. करंजाडे ग्रामपंचायत मध्ये विद्यमान सरपंच रामेश्वर बबन आंग्रे हे पुन्हा एकदा थेट सरपंच पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. महाविकास आघाडीचे अकरा सदस्य केलेल्या विकास कामांच्या जोरावरती मतांचा जोगवा मागत आहेत. याचाच एक भाग म्हणून रविवार दिनांक ११ डिसेंबर रोजी करंजाडे येथे शेतकरी कामगार पक्ष,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस, वंचित व बहुजन आघाडी अशा मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीने प्रचार फेरीचे आयोजन केले होते. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि प्रचंड उत्साह या प्रचार फेरीमध्ये दिसून आला. महाविकास आघाडी, रामेश्वर आंग्रे आणि अकरा सदस्यांच्या जयघोषाच्या घोषणांनी रविवारी सकाळच्या सत्रात करंजाडे परिसरात आसमान दुमदुमले होते.

शेतकरी कामगार पक्षाचे पनवेल शहर जिल्हा चिटणीस गणेश चंद्रकांत कडू, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा अनुराधा ठोकळ आदींच्या प्रमुख उपस्थित प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थियांना संबोधित करताना गणेश कडू म्हणाले की, रामेश्वर आंग्रे आणि त्यांच्या सर्वच सदस्यांनी भरभरून विकास कामे केली आहेत. आपल्या कार्यकालाच्या अखेरच्या दिवसापर्यंत अगदी विरोधकांची सुद्धा विकास कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे आम्ही केलेल्या विकास कामांच्या जोरावर आमचे सगळे सदस्य आणि रामेश्वर आंग्रे भरघोस मतांनी निवडून येतील असा मला विश्वास वाटतो. नुकत्याच झालेल्या पनवेल अर्बन को-ऑपरेटिव्ह निवडणुकीमध्ये बँकेवर आर्थिक ताण येऊ नये या प्रामाणिक उद्देशाने आम्ही भारतीय जनता पार्टीकडे निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. जनभावनेचा आदर न करता विरोधकांनी बँकेच्या माथी ही निवडणूक मारली.

महाविकास आघाडीला मतदारांनी भरभरून मतदान केले आणि विरोधकांच्या चारी मुंड्या चित करत त्यांना आम्ही आसमान दाखवले. येणाऱ्या काळात आगामी सगळ्या निवडणुकांच्यात हेच चित्र पाहायला मिळेल असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतो. रामेश्वर आंग्रे आणि त्यांच्या तमाम सदस्यांना मी विजयी होण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देतो.

ग्रामपंचायत हद्दीतील दैवतांपुढे नतमस्तक होत विविध धार्मिक स्थळांमध्ये अभिवादन करत प्रचार फेरीला प्रारंभ करण्यात आला. थेट सरपंच पदाचे उमेदवार असणारे रामेश्वर बबन आंग्रे यांची निशाणी कपबशी असून, प्रभाग क्रमांक १ मध्ये अंजना शिवाजी कातकरी यांचे निशाणी गॅस सिलेंडर आणि विद्यमान उपसरपंच योगेंद्र दत्ताराम कैकाडी यांची निशाणी बॅट हे निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक दोन मध्ये अक्षय मोहन गायकवाड निशाणी बॅट, उमेश शंकर भोईर निशाणी पंखा,कोमल रवी खिलारे निशाणी गॅस सिलेंडर असे तीन उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक तीन मधून श्रुती निलेश गायकवाड निशाणी बॅट, नीता योगेश राणे निशाणी गॅस सिलेंडर, रुपेश बबन आंग्रे निशाणी पंखा असे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक चार मध्ये कल्पना विनेश गायकर निशाणी पंखा, नीलम मोहन भगत निशाणी गॅस सिलेंडर, ध्रुव रामचंद्र बोरकर निशाणी बॅट असे तीन उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

चार झेंडे घेऊ हाती,करंजाडे च्या विकासासाठी! महाविकास आघाडीचा विजय असो!!, रामेश्वर आंग्रे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…! अशा घोषणांनी करंजाडे चा परिसर दुमदुमून गेला होता. शेतकरी कामगार पक्ष,शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,वंचित आणि बहुजन आघाडी, आशा मित्र पक्षांच्या महाविकास आघाडीचे कार्यकर्ते झेंडे,मफलर, होर्डिंग घेऊन मोठ्या संख्येने प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले होते. विशेष म्हणजे माता भगिनींच्या रूपात महिला शक्ती मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती उतरून महाविकास आघाडीचा प्रचार करताना दिसून येत होती. ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग देखील विलक्षण होता. एकंदरीतच समाजातील विविध गटातील, विविध धर्मातील नागरिक उत्स्फूर्तपणे महाविकास आघाडीच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी झाल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.