Press "Enter" to skip to content

बॅ ए आर अंतुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आंबेत येथील स्मृतीस्थळी विनम्र अभिवादन

अंतुले साहेबांचे अपुरे कार्य पुढे नेण्यासाठी सदैव तत्पर राहू : अभिजीत पाटील

अंतुले साहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यावर नेहमीच नवी ऊर्जा मिळते : सुदाम पाटील

सिटी बेल ∆ आंबेत ∆ प्रतिनिधी

राज्याचे माजी मुख्यमंत्री, कोकणचे भाग्यविधाते बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, रोजगार व स्वयंरोजगार विभाग पनवेल शहर जिल्हाध्यक्ष भाई म्हात्रे व प्रताप गावंड यांनी आंबेत येथे बॅ ए आर अंतुले यांच्या स्मृतीस्थळी दर्शन घेऊन आदरांजली वाहिली. तसेच बॅ ए आर अंतुले यांच्या आंबेत येथील निवासस्थानी तसेच श्रीवर्धन, म्हसळा तालुक्याला भेट देऊन माजी आमदार मुश्ताकभाई अंतुले व जेष्ठ नेते आर सी घरत यांच्यासह पुढील राजकीय वाटचालीबाबत व बॅ ए आर अंतुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांबद्दल सविस्तर चर्चाही केली. आंबेत येथील बॅरिस्टर ए आर अंतुले यांच्या स्मृतीस्थळी अंतुले यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांच्याप्रती कृतज्ञताही व्यक्त करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष अभिजीत पाटील म्हणाले, अंतुले साहेब म्हणजे सामान्यातील असामान्य नेतृत्व होते. त्यांनी कधीही राजकारण न करता नेहमीच समाजकारणाला प्राधान्य दिले. खऱ्या अर्थाने ते गोरगरिबांचे, कष्टकऱ्यांचे, कामगारांचे व समाजातील तळागातील नागरिकांचे नेते होते. त्यामुळे त्यांच्यासारखे साधी राहणी आणि उच्च विचार असणारे नेते परत कधीही होणार नाही. अंतुले साहेबांच्या स्मृती स्थळावर आल्यावर कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असल्याचे लक्षात येते. साहेबांचे कार्य अलौकिक आहे. त्यांनी प्रत्येक कार्यकर्त्यावर मुलाप्रमाणे प्रेम केले. आम्हाला त्यांचा सहवास व वेळोवेळी मार्गदर्शन लाभले याचा अभिमान वाटतो. त्यामुळे त्यांनी दिलेल्या शिकवणीनुसार अंतुले साहेबांचे समाजकार्य पुढे नेण्याचे नेहमीच काम करत राहू. साहेब परिसासारखे होते, ज्यांना ज्यांना त्यांचा स्पर्श झाला त्याचे सोने झाले. येणाऱ्या काळात त्यांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. आज त्यांचा मायेचा हात जरी हरवला असेल तरीही त्यांचे प्रेम आणि आशिर्वाद सदैव आमच्या पाठीशी असणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील म्हणाले की, अंतुले साहेबांचे सोडून जाणे म्हणजे रायगड वासियांसाठी आजचा काळा दिवस असेल. अंतुले साहेब आमच्यात नाहीत असे वाटतच नाही. अंतुले साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्राला प्रेम दिले. रायगडमध्ये असणारे वैभव हे अंतुले साहेबांमुळे आहे. त्यांच्या काळात अनेक धाडसी निर्णय त्यांनी घेतले. साहेबांच्या शेवटच्या काळात त्यांचा सहवास लाभला. ते राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, खासदार आणि आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते असा दुजाभाव त्यांनी कधीही दाखवला नाही. साहेब अत्यंत प्रेमळ होते. त्यांचा ८५ वा वाढदिवस करण्याचे जेंव्हा आम्ही ठरवले तेव्हा त्यांची प्रकृती ठीक नव्हती. तरीही कार्यकर्त्यांची इच्छा होती की त्यांनी एकदा जिल्ह्यात यावे आणि इथल्या कार्यकर्त्याना प्रोत्साहन द्यावे. प्रकृती अत्यवस्थ असताना देखील त्यांनी येण्यास होकार दिला. त्यावेळीचे त्यांचे शब्द अजूनही आठवतात की तुमच्यामध्ये मला माझे जुने दिवस दिसतात. तुमच्या सारख्यांची आता जिल्ह्याला, राज्याला, देशाला गरज आहे. अंतुले साहेबांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतल्यावर नेहमीच नवी ऊर्जा मिळते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.