

आकाश कवेत घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीचे हात किमान आभाळापेक्षा मोठे हवेत हा एक साधा सिद्धांत आहे. थोडक्यात काय तर कुठल्याही अगम्य ध्येय्य प्राप्तीसाठी आपण तितकीच अभ्यासपूर्ण तयारी केलेली असली पाहिजे. नेमकी याच अभ्यासपूर्ण तयारीची कमतरता यंदाच्या T 20 वर्ल्ड कप संघाच्यात दिसून आली.रविवारी अंतिम सामन्याचा आनंद घेताना त्यात भारत नसल्याचे शल्य क्षणोक्षणी बोचत होते. पण अशा प्रकारच्या अंतिम सामन्यात खेळण्याची कुवत भारतीय संघात होती का? या प्रश्नाचे उत्तर शोधणे देखील तितकेच गरजेचे आहे.
राहुल द्रविड कितीही धोरणी कोच, नियोजनबद्ध खेळाडू, सहृदयी माणूस असला तरीही T 20 संघाचा कोच होण्याची गुणवत्ता त्याच्या ठायी नाही. वीस षटकांच्या सामन्यांमध्ये संघ तयार करताना प्रत्येक नाणं खणखणीत घ्यावं लागतं. विक्रोमांचे गाठोडे कितीही भलं मोठं असलं तरीही आज त्या खेळाडूकडे काय गुणवत्ता आहे हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असतं. विराट कोहली हा अख्खी इनिंग चालविणारा जगातला पहिल्या क्रमांकाचा खेळाडू आपल्या संघात आहे. त्यानी त्याची उपयुक्तता प्रत्येक सामन्यात सिद्ध करून दाखवली. हार्दिक पांड्या हा शेवटच्या षटकांत हाणामारी करणारा अत्यंत घातक फलंदाज आहे, तो चांगला फिनिशर आहे, त्याची मध्यमगती गोलंदाजी त्याला एक परिपूर्ण अष्टपैलू खेळाडू बनविते ह्या सर्व आपल्यासाठी सकारात्मक बाबी होत्या. हार्दिक पांड्या च्या धाटणीचा असणारा रवींद्र जडेजाची कमतरता पदोपदी जाणवत होती.
चौथ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव अत्यंत चपखल बसणारा खेळाडू आहे. फटक्यांची वाईड रेंज असणारा हा फलंदाज आजमितिला जगात पहिल्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्यानी त्याची उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध केली,पण सूर्या ची विकेट पडल्यानंतर तशा स्वरूपाची फलंदाजी करणारा खेळाडू दुर्दैवाने या वर्ल्डकपच्या संघात नव्हता. सलामीच्या फलंदाजांचे सातत्यपूर्ण अपयश हे सूर्यकुमार यादव, विराट कोहली हार्दिक पांड्या यांनी कित्येक वेळा सांभाळून घेतले. तरीही फॉर्म साठी धडपडणारा के एल राहुल आणि फिटनेस व टाइमिंग या दोन्ही गोष्टींपासून कोसो दूर गेलेला रोहित शर्मा यांनीच ओपनिंग केली पाहिजे हा अट्टाहास कशासाठी? आयपीएल मध्ये गाजलेले किमान 12 सलामी फलंदाज आजही संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत, अनेक वेळा संध्या देऊन सुद्धा माती खाणारा के एल राहुल याच्यावर प्रत्येक वेळी दाव खेळणे हेच आज आपण अंतिम सामन्यात नसल्याचे मुख्य कारण आहे.
सततच्या इन्जुरी होणे, त्यामुळे फिटनेस हरवलेला ऋषभ पंत याच्याकडे खरं तर मर्यादित फटके आहेत. कुठलाही तगडा संघ त्याला फारसा वरचढ ठरू देत नाही. त्याला पर्याय म्हणून दिनेश कार्तिक सारख्या एक मॅच मध्ये हिरो झालेल्या फलंदाजाला पर्याय म्हणून वापरणे हे खरंच अनाकलनीय आहे. संजू सॅमसंग किंवा ईशांत किशन यांच्यापैकी एक एक्स्प्लॉजिव्ह विकेटकीपर ओपनर संघात घेतला तर एक अतिरिक्त फलंदाज खेळवण्याची लिबर्टी मिळते हे जर सिलेक्टर्स मंडळींना समजत नसेल तर त्या पदावर बसण्याचा त्यांना काडीचाही अधिकार नाही. आज अंतिम फेरीत दाखल झालेल्या पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन्ही संघांचा विकेटकीपर हा एकस्पलोझिव ओपनर आहे. खरंतर हा काही योगायोग वगैरे नाही तर ही एक स्ट्रॅटेजी आहे जी या दोन संघांनी परिपूर्णरित्या अवलंबली आहे. अशीच स्ट्रॅटेजी क्विंटन डी कॉक च्या स्वरूपात दक्षिण आफ्रिकेने देखील अंगिकारली आहे परंतु आयसीसी स्पर्धांच्यात ऐनवेळी माती खाण्याचा त्यांचा गुणधर्म त्यांनी याही वेळेला पाळला.
गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये भुवनेश्वर आणि शमी ही जोडी खेळवणे हा आपल्या पराभवाचा पाया आहे. भुवनेश्वर चे स्विंग आणि नकल बॉल एव्हाना क्रिकेट खेळणाऱ्या बहुतांश देशाच्या खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना उमजले आहेत. महंमद शमी काय व्हेरिएशन करणार आहे ते सहज पीक करता येतं. त्याच्या सुरुवातीच्या शटकांमधील त्याचा स्विंग एकदा का खेळून काढला की शमी हा अत्यंत ऑर्डीनरी बॉलर ठरतो. ऑस्ट्रेलिया सारख्या बाउन्स असणाऱ्या विकेट वरती जसप्रीत बुम्राह च्या अनुपस्थितीत उमरान मलिक आणि हर्षल पटेल ही द्रुतगती गोलंदाजांची जोडी जर का अर्शदिप सिंग च्या सोबतीला असती तर आज चित्र निश्चितच वेगळं असतं.आश्विन वर इतका विश्वास दाखवत त्याला वारंवार संधी का दिली जाते हे देखील संशोधन करण्याचे मटेरियल आहे. अक्सर पटेल हा रवींद्र जडेजा ची रिप्लेसमेंट होऊ शकत नाही हे पुन्हा एकदा या वर्ल्डकप दौऱ्याने सिद्ध केले.
आता काहीशा तांत्रिक बाबींच्या बद्दल बोलूयात, वीस षटकांच्या क्रिकेटमध्ये यंग लेग्ज असतील तर त्या संघाला एक ॲडिशनल बेनिफिट मिळतो.आपण मुरलेल्या खेळाडूंच्या सिलेक्शन वर जास्त भर दिला. शॉर्ट फॉरमॅट मध्ये किमान चार खेळाडू पंचविशीच्या आसपासचे असावेत म्हणजे संघ संतुलित राहतो.ॲडिशनल बेनिफिट मिळवण्यात आपण कमी पडलो.आयपीएल ची अतिशयोक्ती होते आहे का? क्रिकेटची दरवर्षी भरणारी ही सर्कस अमाप पैसे कमवून देते असे ऐकले होते. पण 2008 सालापासून आयपीएल नामक सोन्याचं अंड देणारी ही कोंबडी जेव्हापासून तमाशा करू लागली तेव्हापासून भारताच्या पदरामध्ये एकही आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप पडलेला नाही.2011 चा वर्ल्ड कप पन्नास षटकांच्या स्पर्धेचा होता. भारताच्या खेळाडूंनी अन्य देशांच्या प्रीमियर लीग मध्ये खेळण्यास कधीही इंटरेस्ट दाखवल्याचे ऐकिवात नाही.( आज राहुल द्रविडला नेमकी याचीच गरज वाटत आहे) याची दोन कारणे असू शकतात, पहिले महत्त्वाचे कारण म्हणजे BCCI ने शेड्युल केलेल्या दौऱ्यानुसार अन्य देशांच्या प्रीमियर लीग खेळताना वेळापत्रक ऍडजेस्ट करता येत नाही. आणि दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे मिळणारे मानधन! अन्य प्रीमियर लीगचे बजेट पाहता त्याची आयपीएल बरोबर तुलना करणे म्हणजे सूर्याची काजव्या बरोबर तुलना करण्याचा प्रकार होईल.आपल्या प्रीमियर लीग मध्ये पाकिस्तान सोडून बाकीच्या सगळ्या देशांतील मॅच विनर्स आपला पाहुणचार घेऊन जातात.
मी एक गोष्ट सातत्याने लिहीत असतो, आपला देश तीन गोष्टींच्या बाबतीत अत्यंत संवेदनशील आहे. राजकारण सिनेमा आणि क्रिकेट यामध्ये जो रमत नाही तो भारतीय नाही…त्यामुळे वर्ल्ड कप मधील हार कित्येकांच्या जिव्हारी लागली असेल. आज हरल्याचे दुःख नाही, पण आपण जिंकण्याची तयारीच केलेली नव्हती याचे जास्त वाईट वाटते.



Be First to Comment