Press "Enter" to skip to content

पनवेल प्रवासी संघाच्या आंदोलनाला महविकास आघाडी चा पाठिंबा

एसटी स्थानक उभारणीच्या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते होणार सक्रिय सहभागी

सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆

तब्बल १४ वर्षांच्या वनवासानंतर देखील राज्य परिवहन मंडळाच्या पनवेल स्थानकाचे शुक्लकाष्ठ संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पनवेल प्रवासी संघ, प्रस्तावित बांधा व हस्तांतरित करा धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या स्थानक संकुल इमारतीचे साठी पाठपुरावा करत आला आहे. २०१८ साली या कामासाठी प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्या नंतर सुद्धा अद्यापही प्रत्यक्ष कामास सुरुवात झालेली नाही. सदरचा प्रकल्प लाल फितीच्या कारभारात अडकला असल्याकारणामुळे प्रशासनास जागृत करण्यासाठी पनवेल प्रवासी संघाने आंदोलनाचे संविधानिक हत्यार उपसण्याचे ठरविले आहे. ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणाऱ्या पनवेल प्रवासी संघाच्या या आंदोलनास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पाठिंबा दर्शवत कार्यकर्त्यांसमवेत सक्रिय सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.

पनवेल प्रवासी संघाचे पदाधिकारी अभिजीत पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार बाळाराम पाटील, सुप्रसिद्ध उद्योजक जे एम म्हात्रे यांना आंदोलनाचे पत्र दिले असता या द्वयीने सदरच्या आंदोलनास जाहीर पाठिंबा दर्शवत हिरीरीने सहभागी होणार असल्याचे कळविले. अशाच स्वरूपाचे पत्र शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) रायगड जिल्हा सल्लागार तथा प्रवक्ते बबन दादा पाटील यांना देण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुदाम गोकुळशेठ पाटील यांना देखील आंदोलनाचे पत्र अभिजीत पाटील यांनी दिले.

स्वतः अभिजीत पाटील हे काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष असून काँग्रेस पक्ष देखील पनवेल प्रवासी संघाच्या आंदोलनात अग्रस्थानी असेल असे त्यांनी सांगितले.

बबन दादा पाटील म्हणाले की, मी कार्यकर्त्यांच्या फौजेसह हिरीरीने या आंदोलनात सहभागी होणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची संपूर्ण ताकद पनवेल प्रवासी संघाच्या आंदोलनापाठी असेल अशी ग्वाही सुदाम पाटील यांनी दिली. भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना अशा सत्ताधाऱ्यांसह सर्वच राजकीय पक्षांना पनवेल प्रवासी संघाने या आंदोलनाबाबत सूचित केले आहे. तसेच सिटीजन युनिटी फोरम, ग्राहक संरक्षण मंच, पनवेल संघर्ष समिती, ज्येष्ठ नागरिक संघ यांसारख्या सामाजिक संस्थांना देखील सदर आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आल्याचे समजते.

कोकण विभाग आणि मुंबई विभागाला जोडणारे अत्यंत महत्त्वपूर्ण राज्य परिवहन मंडळाचे स्थानक म्हणून पनवेल अधोरेखित झालेले आहे. बांधा व हस्तांतरित करा धरतीवर महाराष्ट्रात पाच ठिकाणी स्थानक संकुल उभारण्यात येणार आहे. तूर्तास पनवेल स्थानकातून दररोज ४००० बस गाड्यांची ये जा होत असते. येथील कर्मचारी देखील जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतीमध्ये सध्या काम करत आहेत. प्रवाशांसाठी निवारा शेड अपुऱ्या आहेत, ज्या शेड आहेत त्या फुटक्या गळक्या असल्यामुळे पावसाळ्यात वापरण्याजोग्या रहात नाहीत. एकुलत्या एक सार्वजनिक शौचालयात दुर्गंधीचे साम्राज्य नेहमी पसरलेले असते. अस्वच्छता तर पाचवीला पुजलेली असते. स्थानक आवारामध्ये खड्ड्यांचे राज्य पसरले आहे. या असुविधांमुळे प्रवासी नागरिकांना विनाकारण जाच सहन करावा लागत आहे. स्थानक संकुल उभारणी सोबतच प्रवाशांच्या उपरोक्त असुविधाना देखील प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा पनवेल प्रवासी संघाचा उद्देश असणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.