मृत्यूमुखी पडलेल्या विष्णू पाटील यांना कायमस्वरूपी नोकरी व नुकसान भरपाई मिळावी यासाठी किरीट पाटील यांनी लिहिले मुख्यमंत्र्यांना पत्र
सिटी बेल ∆ उरण ∆ विठ्ठल ममताबादे ∆
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या उरण महाजनको सयंत्रात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या बोकडविरा गावातील प्रकल्पग्रस्त विष्णू यशवंत पाटील यांच्या परिवारास कायमस्वरूपी नोकरी मिळावे व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पत्रव्यवहाराद्वारे रायगड जिल्हा इटंकचे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र प्रदेश इटंक अध्यक्ष जयप्रकाश छाजेड,कामगार नेते महेंद्र घरत, जिल्हाधिकारी रायगड, तहसीलदार उरण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक उरण यांच्याकडे केली आहे.
रविवार दिनांक 9/10/ 2022 रोजी उरण तालुका, जिल्हा रायगड येथील महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या महाजनको वायू विदयुत केंद्रात बॉयलर चा स्फोट होऊन तेथील अभियांत्रिक विवेक धुमाळ, कामगार कुंदन कमळाकर पाटील व कंत्राटी कामगार विष्णु यशवंत पाटील यांचे दुःखद निधन झाले आहे. यातील विष्णू यशवंत पाटील हे बोकडविरा गावातील प्रकल्पग्रस्त कामगार होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या परिवारास उपासमारीची वेळ आली आहे. सदर परिवाराची जमीन ही प्रकल्पासाठी संपादित केलेली आहे. सदर घटनेची गंभीरता पाहता व विष्णु यशवंत पाटील यांच्या परिवाराची स्थिती पाहता आपण सहानभूतीपूर्वक विचार करावा यासाठी सदर प्रकल्पातर्फे त्यांच्या परिवाराचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीकोनातून वरिष्ठा कडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्याचा सकारात्मक विचार करण्यात यावा यासाठी आपण योग्य पद्धतीने सकारात्मक निर्णय घ्यावा व लवकरात लवकर विष्णू यशवंत पाटील यांच्या परिवारास न्याय मिळवून द्यावा अशी मागणी किरीट पाटील यांनी पत्रव्यवहाराद्वारे मुख्यमंत्री व इतर शासकीय अधिकाऱ्यांना केली आहे.
हि घटना रविवारी सुट्टीच्या दिवशी घडली आहे त्यामुळे अधिक जिवीतहानी टळली आहे. हि दुर्घटना अतिशय मोठी व गंभीर आहे. तरी सदर संयंत्राचे सेफ्टी ऑडीट करण्यात यावे तसेच या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशी दुर्घटना घडू नये.असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
Be First to Comment