कार्यकर्ते बांधवांना पदांचा अनुभव मिळावा म्हणून वेळेआधी राजीनामे देणाऱ्या शेकाप कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो : सरपंच डी बी म्हात्रे
सिटी बेल ∆ वावंजे – तळोजा ∆
ग्रुप ग्रामपचायत वावंजे च्या उपसरपंचपदी गुरुवार दिनांक ७ ऑक्टोबर रोजी आनंदी सुदाम कातकरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच धनाजी बाळाराम म्हात्रे उर्फ डी. बी.म्हात्रे यांनी त्यांना यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या.
मावळते उपसरपंच जीनेश मापा पाटील यांचा कार्यकाल संपल्या नंतर रिक्त असलेल्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया गुरुवारी संपन्न झाली. ग्रामविकास अधिकारी नरेश म्हात्रे यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले.आनंदी सुदाम कातकरी यांचा एकमेव वैध अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होत असल्याची घोषणा त्यांनी केली.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सरपंच डी बी म्हात्रे म्हणाले की, आमदार बाळाराम पाटील आणि पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील यांनी आम्हाला घालून दिलेल्या पक्ष शिस्तीची शिकवणी प्रत्येक कार्यकर्ता अनुसरत असतो. त्यानुसार कार्यकाल पूर्ण व्हायच्या अगोदरच जे जे कार्यकर्ते राजीनामे सादर करतात त्यांचा मला सार्थ अभिमान वाटतो. जिनेश यांनी सुद्धा कार्यकाल पूर्ण व्हायच्या अगोदर राजीनामा दिलेला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांना पदसिद्धतेचा अनुभव यावा या उदात्त हेतूने घालून दिलेल्या पायांड्यामुळे अनेक कार्यकर्ते सक्रिय राजकारणात यशस्वी होत आहेत.
जीनेश पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, माझा कार्यकाल अत्यंत अनुभव संपन्न असा होता. गणेश घाटावरती पत्र्यांचे अच्छादन बसविणे,ज्ञानदेव पवार यांचे घर ते मापा पाटील यांचे घर हा रस्ता काँक्रिटीकरण करणे यासह अनेक विकास कामांना माझ्या कार्यकाळात गती देता आली याचे समाधान आहे. नवनिर्वाचित उपसरपंचांना माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा.
यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच आनंदी सुदाम कातकरी यांचे अभिनंदन करण्यासाठी सरपंच डी बी म्हात्रे, मावळते सरपंच दिनेश मापा म्हात्रे. ग्रामविकास अधिकारी नरेश म्हात्रे, सदस्य पूनम देविदास धोंगडे,प्रमिला ज्ञानेश्वर चोरमेकर,अरुण पदू कातकरी,कांचन विकास पाटील, देवचंद दत्तात्रय पाटील, शेतकरी कामगार पक्षाचे वावांजे विभागीय चिटणीस मच्छिंद्र पाटील आदी मान्यवरांच्या सह कार्यकर्ते, ग्रुप ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Be First to Comment