सिटी बेल ∆ पेण ∆ वार्ताहर ∆
पेण तालुक्यातील पाबळ ग्रामपंचायत मध्ये २०१९ च्या थेट सरपंच पदाच्या निवडणुकीत सरपंच निवडून आलेल्या राजश्री राजाराम जाधव यांचा जात प्रमाणपत्र अवैध झाल्याचे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निर्णय दिला आहे.
पाबळ सरपंच जाधव या २००२ साली याच जातीच्या दाखल्यावर सदस्य म्हणून निवडून आल्या त्यानंतर २००७ साली पण पेण पंचायत समितीच्या पाबळ गणातून सदस्य निवडून येत त्यांनी २०१९ च्या पाबळ ग्रामपंचायत थेट सरपंच पदाची निवडणुकीतही त्यांनी याच जातप्रमाणपत्राच्या आधारे निवडणुक लढवून त्या जिंकून आल्या मात्र याच निवडणुकीत सरपंच पदाच्या उमेदवार असणा-या राजश्री नरेश शिंदे यांनी त्यांच्या जातीच्या दाखल्या बाबत आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल केली होती.
तक्रारदार यांनी जोडलेल्या सबळ पुराव्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती रायगड यांना १६ जुन २०२२ रोजी पुनर तपासणी करण्याचे आदेश दिले.त्या आदेशानुसार समितीच्या दक्षता पथका मार्फत प्रत्यक्ष तपासणी केली असता सरपंच राजश्री जाधव उर्फ लता गणपत ठाकुर यांनी सादर केलेल्या नागोठणे येथील शाळा सोडल्याचा दाखला हिंदु मराठा आहे.तर त्यांचे प्राथमिक शिक्षण वांगणी तालुका रोहा येथील शाळेत झाले ते देखील हिंदु मराठा म्हणुन आहे.सदर जातीचा दाखला काढताना सोबत जोडलेला प्रभाकर महादु ठाकुर यांच्या ही शाळा सोडल्याचा दाखल्यावर हिंदु मराठा नोंद आहे. तसेच महादु तात्या ठाकुर / महादेव तात्या ठाकुर यांची रोहा तहसिलदार गाव नमुना १४ मध्ये मराठा अशी नोंद आढळली आहे.
या दक्षता समितीने वांगणी तालुका रोहा ग्रामस्थांकडे देखील चौकशी केली असता त्यांची जात ही मराठा असल्याचे समितीच्या निदर्शनास आले.त्यामुळे दक्षता पथकाने आपला अहवाल जिल्हा जात प्रमाणपत्र समिती रायगड यांचेकडे सादर केल्यानंतर २३ सप्टेंबर २०२२ रोजी विद्यमान सरपंच राजश्री राजाराम जाधव यांचा जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आला असल्याची माहिती नरेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
Be First to Comment