Press "Enter" to skip to content

सलाम नंदुरबार पोलीसांना !

नंदुरबार पोलीसांचा अनोखा उपक्रम, नदीवर उभारला पूल !

सिटी बेल ∆ रामकृष्ण पाटील ∆ नंदुरबार ∆

एकीकडे अवघा देश स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव साजरा करीत असताना आणि फ्लायओव्हर…सी लिंक व स्काय वाकच्या जमान्यात नंदुरबार सारख्या आदिवासी जिल्ह्यात सातपुड्याच्या दुर्गम भागांत नदीवर पूलच नसल्याने (स्कूल बस वैगेरे लांबची गोष्ट) आधीच शिक्षणापासून वंचित असणाऱ्या हजारो आदिवासी विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात शाळेत कसे जायचे हा वर्षानुवर्षे प्रश्न होता.नंदुरबार पोलिसांनी निसर्गाचे हे आव्हान स्वीकारले. कोणत्याही मदतीची वाट न पहाता पोलीसांनी ४ दिवसात शाळेकडे जाणाऱ्या नदीवर पूल उभारुन आदिवासींना खऱ्या अर्थाने शिक्षणाचे स्वातंत्र्य प्राप्त करुन दिले आहे.

काल्लेखेतपाडा हा सातपुड्यातला धडगाव तालुक्यांतला अतिदुर्गम आदिवासी परिसर.जगातल्या सर्व समस्या ठासून भरलेला हा भाग. गरोदर महिलेस खांद्यावर बांबूच्या झोळीतून पायी कित्येक मैल दवाखान्यात घेऊन जावे लागते. परवाच एका महिलेने अशा झोळीतच बाळाला जन्म दिला.इथे मनुष्याला जन्मतःच समस्यांशी ओळख होते.परंतु कितीही त्रास झाला तरी तक्रार करणे हे त्यांच्या रक्तातच नाही.

मागील आठवड्यात या परिसरातल्या पाड्यातल्या विद्यार्थ्यांना नदीवर पूल नसल्यामुळे पावसाने आलेल्या पाण्यातून शाळेत जावे लागत होते.या पाण्यातून वाहत आलेले साप विंचू यांच्या भितीने मुलांनी शाळेत जाणेच बंद केल्याचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना समजले. श्री.पाटील हे सामाजिक कामात नेहमीच पुढे असतात.त्यांनी परिचितांकडून लोखंडी साहित्य जमा केले. जवळपास वेल्डिंगची व्यवस्था नसल्याने काल्लेखेतपाडापासून तब्बल ७० कि.मी. वरील शहादा येथून हे साहित्य वेल्डिंग करुन ५० फूट लांबीचा पूल तयार करुन आणला. तो बसवण्यासाठी सातपुड्याच्या या डोंगरात मजूर मिळणे शक्य नव्हते. पोलीसांनीच ३ दिवस श्रमदान केले आणि शिक्षण आणि वंचित आदिवासी यांच्यातली दरी संपून हा ऐतिहासिक सेतू तयार झाला.

पोलीसांची चिकाटी पाहून मग शिक्षक व मुलेही मदतीला धावली. डोंगरदऱ्यातला आदिवासी आणि शिक्षणाच्या पर्यायाने विकासाच्या मार्गातला अडथळा दूर करण्यासाठी पोलीसांनी पुढीकार घेतला. पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील स्वतः गावात आले. पूलावर लावलेल्या तिरंग्याच्या साक्षीने स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला “भारतमाता की जय” च्या घोषात काल्लेखेतपाडा गावचे जेष्ठ आदिवासी नागरिक वेल्ज्या बद्या पावरा (वय ९०) व इ.५ वी ची विद्यार्थिनी सुवर्णा माका पावरा या दोघांच्या हस्ते पूलाचे उद्घाटन केले.काल्लेखेतपाडाच नव्हे तर आजुबाजूच्या गावातले गावकरी आणि विद्यार्थी यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता.

पी आर पाटील ( पोलीस अधीक्षक नंदुरबार जिल्हा )

नंदुरबारच्या पोलीस अधीक्षकांची ही सेतूची संकल्पना अंमलात आणणेसाठी धडगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोकुळ औताडे व त्यांच्या टीमने मेहनत घेतली.यावेळी पोलीस उपअधीक्षक श्री संभाजी सावंत, पो.नि. रविंद्र कळमकर हे उपस्थित होते. चांगल्या उपक्रमांमुळे नंदुरबार पोलीस सतत चर्चेत असतात.परंतु गेल्या ७५ वर्षात मोठे पोलीस अधिकारी गावात आल्याचे लोकांनी पहिल्यांदाच पाहिले, तेही सोबत अनोखी भेट घेऊन.

आदिवासींच्या झोपडीपर्यंत शिक्षणाचा सेतू…नव्हे महामार्ग नेणाऱ्या नंदुरबार पोलीसांचे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात सर्वत्र कौतुक होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.