शेकाप च्या माजी नगरसेवकासह राष्ट्रवादी व शेकापच्या पदाधिकाऱ्याने केला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली शेकापचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे, कामोठेतील अर्जुन डांगे, राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश
सिटी बेल ∆ पनवेल ∆ प्रतिनिधी ∆
एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सुरुंग लावणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे महाविकास आघाडीच्या इतर घटक पक्षातील नेतेही आकर्षित होऊ लागले आहेत. त्याचाच परिपाक पनवेलमध्ये ही दिसून आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांनी आपल्या मनगटातील राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून हातामध्ये शिंदे गटाचा झेंडा घेतला आहे. त्याचबरोबर शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक शिवाजी थोरवे आणि कामोठे येथील शेकापचे नेते अर्जुन डांगे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांचा गटाला समर्थन देऊन लाल बावटयाची साथ सोडली आहे. रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथे इन्कमिंग सुरू झाले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून भारतीय जनता पक्षाशी घरोबा केला. त्यांच्यासमवेत पन्नास आमदार, बारा खासदार त्याचबरोबर सेनेचे जिल्हाप्रमुख, इतर पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. आजही मोठ्या प्रमाणात पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करीत आहेत. शिवसेनेला सुरुंग लावत असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्षांनाही धक्का देण्याचे काम केले जात आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सुद्धा रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात मोर्चेबांधणी सुरू आहे. शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांबरोबरच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना सुरुंग लावण्याचे काम सुरू झाले आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पनवेल शहर जिल्हा सचिव चंद्रकांत राऊत यांनी शिंदे गटामध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा सचिव म्हणून गेल्या चार वर्षांपासून चंद्रकांत राऊत काम करीत होते. पक्षसंघटना वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. इतर पक्षातून अनेकांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश दिला.2017 साली चंद्रकांत राऊत यांनी कळंबोली रोडपाली विकास आघाडीकडून निवडणूक लढवली. दरम्यान एकता सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते दरवर्षी रोडपाली चा राजा हा गणेशोत्सव साजरा करतात. रोडपाली व कळंबोलीतील विविध नागरी समस्या त्यांनी सोडवल्या.
शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक असलेले शिवाजी थोरवे हे खांदा वसाहतीमधील शेकापचे तुल्यबळ नेते आहे. रिक्षावाला ते नगरसेवक हा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. बीड जिल्ह्यातील अनेक बेरोजगार तरुणांना पनवेल या ठिकाणी घेऊन येऊन त्यांना रोजगार देण्याचे काम थोरवे यांनी केले आहे. नागरी समस्यांवर आवाज उठवणारे हे नेतृत्व आहे. आरटीई अंतर्गत गरीब गरजू विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून देण्याच्या अनुषंगाने त्यांनी पुढाकार घेतला. अर्ज भरण्यासाठी दरवर्षी ते केंद्र सुरू करतात. आवश्यक कागदपत्रं मिळवून देतात. त्यांच्यामुळे आज शेकडो विद्यार्थी नामांकित शाळांमध्ये मोफत शिक्षण घेत आहेत. हनुमान व श्री शनेश्वर मंदिर ट्रस्ट चे थोरवे अध्यक्ष आहेत. त्यांनी वारकरी संप्रदाय प्रसारक मंडळाची स्थापना केली. दरवर्षी हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जाते. त्यांनीसुद्धा शिंदे गटाची वाट धरली.
शेतकरी कामगार पक्षाचे कामोठा शहर उपाध्यक्ष म्हणून अर्जुन डांगे यांनी काम केले आहे.2017 ला त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली होती. अत्यंत कमी मताने त्यांचा पराभव झाला. दांडगा जनसंपर्क असलेले अर्जुन डांगे हे सर्वांच्या मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध असतात. वाहतूकदारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करणारे अर्जुन डांगे यांनीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला. अमोल पारठे, अनिल राऊत,दत्ता वाबळे, अविनाश परखांदे यांनीही यावेळी प्रवेश केला.
याप्रसंगी पक्षाचे सचिव संजय मोरे, जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे, लातूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख ॲड श्रीनिवास क्षिरसागर, महानगरप्रमुख ॲड प्रथमेश सोमण, तालुकाप्रमुख रुपेश ठोंबरे उपस्थित होते.
महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री ज्या पद्धतीने काम करीत आहेत. त्याचबरोबर त्यांना सामान्यांचे प्रश्न तातडीनं सोडवत आहेत. त्यामुळे त्यांची लोकप्रियता कमालीचे वाढले आहे. ते सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री असल्याने सहाजिकच आमच्या सोबत येणाऱ्यांचा कल वाढू लागला आहे. त्यामुळेच राष्ट्रवाद आणि शेकापच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदय यांना पाठिंबा दिला. आणखी अनेक पदाधिकाऱ्याने कार्यकर्ते आमच्या सोबत येणार आहेत.
रामदास शेवाळे
पनवेल जिल्हा संपर्कप्रमुख शिवसेना शिंदे गट
Be First to Comment