Press "Enter" to skip to content

रोह्यात शिवसेनेच्या आढावा बैठकीत विरोधकांना इशारा

आम्ही रायगडात तीनही आमदारांनी उठाव केल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदलवले,धनुष्यबाण आपलाच असेल : आ.भरत गोगावले

सिटी बेल ∆ धाटाव ∆ शशिकांत मोरे ∆

सर्व समावेशक अशा महापुरुषांचा वारसा लाभलेल्या रायगड जिल्ह्यातील एक छोटासा आमदार मी स्वतःला भाग्यवान समजतो.महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करीत असताना मुख्यमंत्र्यांना अनेकदा कल्पना दिली पण पवार कंपनीच्या ते एवढे आहारी गेले की बाळासाहेबांचे विचार हळूहळू कमी करीत चालले.लावलेल्या वटवृक्षाचे महत्व कमी करायला लागले.जो आम्ही निर्णय घेतलाय तो जनतेने मान्य केलाय,आमच्या बरोबर ८० टक्के जनता असताना आम्ही यांना गद्दार वाटतो आणि हे खुद्दार ? अरे आम्ही महाराजांच्या रायगडचे मावळे आहोत.बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत,आम्हाला अहिरे गहिरे समजताय काय?रायगडला जेंव्हा जाग येते तसे आम्ही तिघांनी महाराष्ट्राला जागे केले आहे.आता मागे हटायचे नाही,तुमची कामे करण्यासाठी आम्ही सोबत आहोत,समर्थांचे सामर्थ्य शिंदे साहेबाना आहे.गणपती सणादरम्यान हा रायगडचा मावळा मंत्रिमंडळात असेल असे सांगून आम्ही रायगडात तीनही आमदारांनी उठाव केल्याने राज्यातील राजकीय समीकरण बदलवले,धनुष्यबाण सुद्धा आपलाच असेल असा इशारा देव पाण्यात बुडवून बसलेल्यांना शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आ.भरत गोगावले यांनी दिला.

रोह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्रामगृहात शिवसेनेच्या वतीने आयोजित आढावा बैठकीत ते आक्रमकपणे बोलत होते.याप्रसंगी आ.महेंद्र दळवी,जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर,राजा केनी,संपर्क प्रमुख चाळके,तालुका प्रमुख मनोजकुमार शिंदे,संतोष खटावकर, उस्मानभाई रोहेकर,यांसह विविध भागातील कार्यकर्ते,महिला इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मंत्रिमंडळ निवडीदरम्यानचे किस्से सांगत असताना ते पुढे म्हणाले की आम्ही थोडा त्याग केलाय पण पुढे चांगले होईल.यापुढे लोकांना न्याय देण्यासाठी जिल्हा परिषद महत्वाची आहे,आपल्याला तेच एक मिशन ठेवायचे आहे.ज्या ठिकाणी यांची मक्तेदारी आहे ती मोडीत काढू.रोह्यातील २६ गाव पाणी योजनेसाठी तब्बल ४० कोटी रुपये शिंदे सरकारने मंजूर केले, तेही तटकरेंना खुपले असल्याची जहरी टीकाही त्यांनी केली.तुम्ही भूमिपूजनाला आलात आता उद्घाटनाला बाकी तुम्ही येणार नाही हे लक्षात ठेवा असा मार्मिक टोला सुद्धा माजी पालकमंत्री अदिती तटकरे यांना लगावला.त्यांचा एक मतदार संघ आम्ही आता दत्तक घेतोय,आता किती काही होऊदे आपल्याला रोखू शकत नाही.आणखी दोन तीन आमदार पक्षात घेणार आहोत.त्यामुळे तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही हे मात्र निश्चतच असे त्यांनी शेवटी सांगितले.

आ.महेंद्र दळवी यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की,आम्ही घेतलेल्या निर्णयाला रायगडातून उठाव झाला तुमच्या सर्वांच्या विचाराने हा निर्णय झाला.या तालुक्यातून जिल्ह्याचे राजकारण अनुभवले.पालकमंत्री हटावात आम्ही श्रेष्ठ ठरलो या सर्व घडामोडींचे खरे साक्षीदार तुम्ही आहात.गुवाहाटी मद्ये असताना अलिबागमधे जे समर्थन दाखविले गेले तरच आम्ही जिंकलो असे सांगत बिनलायकीचे जे होते ते आपल्यातून गेले त्यांचा विचार न करता दोन आमदारांच्या मतदार संघातील गॅप आता भरून काढायची आहे हे लक्षात घेऊन जिल्हा परिषदेवर भगवा फडकवायचे असा चंग मनात बांधा असे ते म्हणाले.

याठिकाणी जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी आपल्या मनोगतात रोह्यात शिंदे गटाची शिवसेना एकनंबरवर राहील असे सांगून जिल्हा तालुक्याबरोबर नगरपालिका सुद्धा सेनेकडे येईल असे काम काम करा असे सांगितले तर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण चाळके यांनी अंतुले साहेबांनी ज्याप्रमाणे निर्णय घेतले त्याचप्रमाने शिंदे साहेबांनी सुद्धा लोकांसाठी चांगले निर्णय घेतले आहेत त्यामुळे भरतशेठ पालकमंत्री होणारच ही काळ्या दगडावरची रेख असल्याचे सांगितले.

सुरुवातीला प्रास्ताविकात तालुकाप्रमुख मनोज कुमार शिंदे यांनी सांगितले की,बाळासाहेब,धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या रोह्यात ताकद मला दोन आमदारांमुळे मिळाली. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या भूमिकेप्रमाणे रोह्यात सुद्धा सर्व ओकेच राहील.२६ गाव पाणी योजनेसाठी ४० कोटी मंजूर केलेत. ते सहाही सरपंच आपले आहेत असे सांगून विभागातील कार्यकर्त्यांबरोबर शहरातील ताकद सुध्दा वाढवणार असे ते म्हणाले.

यावेळी घोसाला विभागातील समीर घोसाळकर यांच्यासह कार्यकर्त्याचा पक्ष प्रवेश करण्यात आला तर उदेश वाडकर, जगन ठाकूर,प्रविण ताडकर, रविराज मोरे,विकास पाटील,मदन गिजे, समिर घोसाळकर,निलेश गोरीवले, गैनिनाथ कटोरे,नयन जोशी, नितीन बामुगडे, समिर सातपुते,शंकर काते,प्रशांत धनावडे,. योगेश खामकर,चंद्रशेखर पवार, शांताराम जाधव,विजय बोरकर, प्रदिप झावरे यासह असंख्य कार्यकर्त्याना त्याच्या विभागातील जबाबदारी म्हणून पदनियुकी पत्र देण्यात आले.

भरतशेठ आगे बढो महेंद्रशेठ आगे बढो..हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणा कार्यकर्ते देत होते.तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश भगत यांनी केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.