रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी ऍड. प्रकाश आंबेडकर,भीमराव आंबेडकर यांचा एल्गार
रिलायन्स नागोठणे प्रकल्पग्रस्त, स्थानिक भूमिपुत्रांच्या लढ्याला आंबेडकर बंधूंची भक्कम साथ : ऍड: प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष
सिटी बेल ∆ रायगड़ ∆ धम्मशील सावंत ∆
पूर्वीची आयपीसीएल व आत्ताची रिलायन्स नागोठने कंपनीने उवर्वीत नोकरी पासून वंचित प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकास तात्काळ कायमस्वरूपी नोकरीत सामावुन घ्यावे यामागणीसह भूमीपुत्रांनी पुन्हा एकदा एकजुट केलीय. त्यामुळे रिलायन्स नागोठणे स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांचा लढा पुन्हा एकदा चेतणार असून स्थानिक भूमिपुत्रांच्या न्यायहक्कांसाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातू तथा वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी या लढ्याचे नेतृत्व हाती घेतले आहे.
त्यामुळे पुन्हा प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड स्फूर्ती व बळ निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन प्रणित भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था चोळे ते नागोठणे पंचक्रोशीतील प्रकल्पग्रस्त न्यायहक्कांसाठी लढत आहेत. आता या लढ्याला आंबेडकर बंधूंची भक्कम साथ मिळालीय.
वंचित बहुजन आघाडीचे नेते ऍड प्रकाश आंबेडकर यांच्या कणखर व स्वाभिमानी नेतृत्वात भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रकल्पग्रस्त व भुमिपुत्र मंगळवारी दि. (23) ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत. यावेळी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर व भीमराव आंबेडकर नेमकी काय भूमिका घेणार ? पुढील आंदोलनाची रणनीति काय असेल ? हे स्पष्ट करणार आहेत.
जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या दालनात मागील झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर पुढे काय कार्यवाही झाली? यावेळी झालेल्या चर्चेत प्रकल्पग्रस्तांच्या पदरात काय पडणार आहे ? या प्रश्नांची उकल जिल्हाधिकारी व रिलायन्स कंपनी व्यवस्थापन यांच्यासमवेत होणाऱ्या या बैठकीत होणार आहे. त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्वाची व निर्णायक मानली जातेय. या आंदोलनात वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे चिटणीस सुरेश मोहिते, रायगड जिल्हाध्यक्ष प्रदीप ओव्हाळ , दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदींसह रायगडसह राज्यातील वंचित बहुजन आघाडीचे नेते व पदाधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या समवेत सहभागी होणार असल्याने या घड़ामोडीकड़े राज्याचे लक्ष लागले आहे.
डॉ .बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य, समता , बंधुता, व न्याय या तत्वावर आधारित संविधान लिहून खंडप्राय असलेल्या देशाला एकसंघ ठेवण्याचे महान कार्य केले. संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकांना आपले हक्क अधिकार मिळवून दिले. डॉ बाबासाहेबांचे हे कार्य ऍड प्रकाश आंबेडकर आपल्या कृतीतून पुढे नेतायत, ऍड प्रकाश आंबेडकर हेच आम्हाला न्याय मिळवून देतील असा विश्वास प्रकल्पग्रस्त व भूमीपुत्रांनी व्यक्त केलाय. शिहू नागोठणे विभागातील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त मागील 35 वर्षांपासून आपल्या हक्कासाठी संघर्षमय लढा देत आहेत. न्यायहक्कांसाठी अनेकदा विविध प्रकारची आंदोलने केली, तुरुंगवास ही सोसला, मात्र आजवर समाधानकारक न्याय मिळाला नसल्याची खंत प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली आहे. आपला लढा रिलायन्स सोबत आहे, या लढ्यात जनशक्तीचे पाठबळ उभे करू, या आंदोलनात स्थानिक भूमिपुत्र व प्रकल्पग्रस्तांसमवेत मोठी ताकत उभी करूयात, विजय आपलाच आहे असा विश्वास सुरेश मोहिते यांनी व्यक्त केला.
स्थानिक प्रकल्पग्रस्त नेते गंगाराम मिनमीने म्हणाले की, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील प्रत्येक घटकाला न्याय व त्यांचे हक्क अधिकार मिळवून दिले, बाळासाहेब आंबेडकर यांच्या स्वाभिमानी , लढाऊ व अभ्यासू नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली उभारलेल्या लढ्याला शंभर टक्के यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. आपल्या न्याय हक्कांसासाठी स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, नलिकाग्रस्त पुन्हा रणमैदानात उतरले आहेत. वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन चे संस्थापक अध्यक्ष ऍड प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आता पुन्हा ताकतीने लढा उभारला आहे. रिलायन्स नागोठणे प्रकल्प ग्रस्तांचे शिष्टमंडळाने नुकतेच बाळासाहेब आंबेडकर व भीमराव आंबेडकर यांची भेट घेतली व स्थानिक भूमीपुत्र , प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली, त्या अनुषंगाने ऍड प्रकाश आंबेडकरांनी प्रकल्पग्रस्तांची बाजू समजून घेत प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढावूपणाची भूमिका घेण्याचे स्पष्ट केले आहे.
Be First to Comment