कर्जतमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार विरोधात आंदोलन
सिटी बेल ∆ कर्जत ∆ संजय गायकवाड ∆
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस चे वाढते दर, सर्वच बाबतीत महागाई, इडीचा गैर वापर आदींसाठी कर्जत तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. या आंदोलनाला जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. घरगुती गॅसचे दर वाढल्याने चूल पेटवून चहा तयार करून आंदोलनाची सुरुवात केली.
कर्जत शहरामधील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चौकात आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू झाले. यावेळी रायगडच्या सहप्रभारी राणी अग्रवाल, इंटकचे जिल्हाध्यक्ष किरीट पाटील, तालुकाध्यक्ष शिवाजी खारीक, शहराध्यक्ष अनंत देवळे, जिल्हा सरचिटणीस धनंजय चाचड, माजी तालुकाध्यक्ष अरविंद पाटील, संजय गवळी, माजी शहराध्यक्ष विजय हरिश्चंद्रे, प्रमोद राईलकर, चंद्रकांत मांडे, अरविंद कटारिया, हेमंत देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी घरगुती गॅसच्या किंमती अव्वाच्या सव्वा वाढल्याने आंदोलन स्थळी महिला कार्यकर्त्या ज्योती जाधव यांनी चूल पेटवून चहा केला. त्यानंतर केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. डिझेल पेट्रोल व गॅस चे दर कमी करा….., जिएसटी रद्द करा, ईडीच्या कारवाया करून भीती दाखवू नका….., आदी घोषणा देण्यात आल्या. त्यांनतर चुलीवर तयार झालेला चहा पिऊन महेंद्र घरत यांनी, ‘काँग्रेसचे सरकार असताना गॅसचे नाममात्र दर वाढले असताना सिलेंडर घेऊन येणाऱ्या खासदार असलेल्या अभिनेत्री सध्या लापता झाल्या आहेत. भाजपा वाल्यांना 2024 च्या निवडणुकीत एकही विरोधी पक्ष ठेवायचा नाही असे वक्तव्य त्यांच्या अध्यक्षांनी केले आहे. याचे कारण केंद्रात सत्ताबदल झाल्यास त्यांनी केलेल्या गोष्टी उघड होतील. याची भीती त्यांना आहे. ईडी ची कारवाई काँग्रेस आणि विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींवर केली जाते परंतु अमित शहा यांच्या मुलाच्या नावे करोडो रुपयांची संपत्ती येते. त्याची चौकशी का करीत नाहीत?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याप्रसंगी सुभाष मदन, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
Be First to Comment