माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
सिटी बेल ∆ पनवेल ∆ संजय कदम ∆
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उलवे येथील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.
यावेळी माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्यासह रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र घरत, चारुताई टोकस, चंद्रकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मा.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तर्फे दिनांक 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट देशातील प्रत्येक जिल्ह्यात 75 किलोमीटर आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन केले आहे. तशाच प्रकारचे आयोजन रायगड जिल्ह्यात सुद्धा करण्यात आले असून त्याची सुरूवात 9 ऑगस्ट रोजी जासई येथून हुतात्म्यांना अभिवादन करून पदयात्रेची सुरूवात पागोटे येथील हुतात्म्यांना मानवंदना देवून करण्यात येणार आहे.
या पदयात्रेत मा.शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित राहणार असून या पदयात्रेचे नेतृत्व नंदराज मुंगाजी व संजय ठाकूर करणार आहेत. तशाच प्रकारे उरण चिरनेर येथून हुतात्म्यांना मानवंदना देवून पुनाडे पर्यंत पदयात्रा करण्यात येणार आहे. 10 ऑगस्ट रोजी पेण येथील विनोबा भावे या जन्मास्थळापासून गांधी मंदिर पेण इतपर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. 12 ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस अभिवादन करून पदयात्रेची सुरूवात किल्ले रायगड ते चवदार तळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून करण्यात येणार आहे.
या पदयात्रेचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, नाना जगताप, स्नेहल जगताप करणार आहेत. तर 13 ऑगस्ट रोजी अलिबाग रेवदंडा नाक्यावरुन चोंढी मार्गे स्वातंत्र्य सैनिक स्तंभापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. 14 ऑगस्ट रोजी कर्जत नेरळ हुतात्मा चौकापासून मानिवली कर्जत ते हुतात्मा स्मारकापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी गावातील ग्रामस्थांना सुद्धा सहभागी करण्यात येणार आहे. तसेच ज्या गावामध्ये स्वातंत्र्य सैनिकांमध्ये कुटुंब आहे. त्यांची सुद्धा भेट घेण्यात येणार असल्याची माहिती महेंद्र घरत यांनी दिली.
भारतीय स्वातंत्र्य लढ्याला गौरवशाली इतिहास आहे. 150 वर्षाचा संघर्ष, त्याग व बलिदानाने आपल्याला हे स्वातंत्र्य मिळाले आहे. या लढ्यात काँग्रेसच्या झेंड्याखाली लाखो लोकांनी आपल्या घरादारांवर तुळसीपत्र ठेवून देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी संघर्ष केला. या स्वातंत्र्यप्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाली म्हणून यंदा हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आपण साजरा करीत असून त्या अंतर्गत राज्यभर आझाद गौरव झेंडा महोत्सव अयोजित करण्यात आला आहे. यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन मा.शिक्षण वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
Be First to Comment