३०० चौरस फूट घरात राहणाऱ्या मुंबईकरांना ५ लाखाचा आरोग्य विमा देणे गरजेचे : खासदार गोपाळ शेट्टी
सिटी बेल • बोरिवली •
देशाची आर्थिक राजधानी मुंबई असून मुंबईकर घडाळ्याच्या काट्यावर चालत असून हे शहर कधीच थांबत नाही, अपवाद कोरोना महामारीचा काळ वगळता या मुंबई शहराला थांबलेले आपण पाहिलेले नाही , परंतु या धावपळीत अनेकांना विविध शारीरिक व मानसिक व्याधींना सामोरे जावे लागते, अशा वेळी आजाराचे निदान व योग्य वैद्यकीय उपचारांची गरज असते. मुंबईत अनेक अल्प उत्पन्न गटातील नागरिक राहत असून अनेकवेळा महागडे उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे मुबलक पॆसे उपलब्ध नसतात अशा मध्यमवर्गीयांसाठी केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या संयुक्त दिद्यमाने मुंबईतील ३०० चौरस फूट अथवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या नागरिकांना ५ लाखाचा आरोग्य विमा देणे गरजेचे आहे असे मत भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी कांदिवली येथे अपेक्स हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी केले.
मुंबईतील आरोग्य क्षेत्रात महत्वाचे योगदान देणाऱ्या अपेक्स हॉस्पिटल समूहातील सहाव्या हॉस्पिटलचे उदघाटन खासदार गोपाळ शेट्टी यांच्या हस्ते आकुर्ली रोड कांदिवली( पूर्व ) येथे पार पडले. अपेक्स हॉस्पिटल समूहाने १६ वर्षांपूर्वी चंदावरकर रोड बोरिवली पश्चिम येथे एका हॉस्पिटलची सुरुवात केली होती व आज समूहातील एकूण हॉस्पिटलची संख्या ६ झाली असून येत्या १० वर्षात अजून पाच हॉस्पिटल सुरु करण्याचा मानस समूहाचे संचालक डॉ. व्रजेश शहा यांनी व्यक्त केला. महत्वाची बाब म्हणजे अपेक्स समूहातील पहिल्या हॉस्पिटलचे उदघाटनसुद्धा खासदार गोपाळ शेट्टी यांनीच केले होते.
यावेळी शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे तसेच भाजपचे आमदार अतुल भातकळकर उपस्थित होते. अपेक्स समूहातील सर्व हॉस्पिटल्स हि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असून कॅथ लॅब, गुडघे व सांधे प्रत्यारोपण, कर्करोग व इतर अनेक सर्वसाधारण आजार व दुर्मिळ आजारांवर यशस्वी उपचार केले जातात.
आकुर्ली रोड , कांदिवली येथील हॉस्पिटलचे उद्घाटन करताना खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले, ” अपेक्स समूहाने आरोग्य क्षेत्रात घेतलेली हि गगनभरारी खरोखरच कौतुकास्पद आहे. अपेक्स हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना योग्य दरात दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी डॉ. व्रजेश शहा व त्यांची टीम हि सदैव तत्पर असते. कांदिवली इथे अपेक्स हॉस्पिटल सुरु झाल्यामुळे याचा फायदा जोगेश्वरी मालाड तसेच कांदिवली येथील नागरिकांना होणार आहे. या सोबतच मी डॉ व्रजेश शहा यांना आवाहन करणार आहे कि त्यांनी कांदिवली येथिल हॉस्पिटलमध्ये गरीब रुग्णांना परवडतील अशा सुविधा निर्माण कराव्यात तसेच केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य योजना इथे कार्यान्वित कराव्या जेणेकरून मुंबईतील गरजू रुग्णांना इथे उपचार उपलब्ध होतील.”
कांदिवली येथिल अपेक्स हॉस्पिटलच्या उदघाटन प्रसंगी बोलताना अपेक्स हॉस्पिटल समूहाचे संचालक डॉ. व्रजेश शहा म्हणाले, ” या हॉस्पिटलमध्ये आम्ही आधुनिक व प्रगत वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित केले असून ईआयसीसीयु ची स्थापना केली आहे. या सुविधेत अतिदक्षता विभागात असलेल्या रुग्णाची माहिती डॉक्टरांच्या मोबाईलवर असणार आहे त्यामुळे डॉक्टरांना २४ तास त्या रुग्णांचे अपडेट मिळत राहणार आहेत.
या हॉस्पिटलटची ५० बेडची क्षमता असून अनुभवी डॉक्टर्स आणि परिचारिका असलेले हे हॉस्पिटल रुग्णांसाठी २४ तास खुले राहणार आहे. तसेच, कॅथ लॅब तसेच दोन ऑपरेशन थिएटर, दहा बेडचा अतिदक्षता विभाग, डायलिसिस सेंटर, नाक कान घसा विभाग, डोळ्यांचा आजारांवर अत्याधुनिक उपचार पद्धती, अत्याधुनिक लॅबोरेटरी, लॅप्रोस्कोपीसंबंधित विभाग, बाह्यरुगण विभाग, प्रसूती विभाग अशी यंत्रणा आहे. या हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी ईएनटी, युरॉलॉजी, न्युरॉलॉजी, स्किन आदींशी संबंधित आजारांवर तपासणी केली जाणार आहे. कांदिवली येथिल अपेक्स हॉस्पिटल मध्ये आम्ही वैद्यकीय ऑटोमेशनवर भर दिला आहे.”
Be First to Comment