Press "Enter" to skip to content

नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशनचा पुरस्कार

जासई हायस्कूल व ज्यू.कॉलेज चे प्राचार्य अरुण घाग “आंतरराज्य आदर्श प्राचार्य गौरव” पुरस्काराने सन्मानित

सिटी बेल • उरण • विठ्ठल ममताबादे •

उरण तालुक्यातील रयत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि. बा. पाटील ज्युनियर कॉलेज जासई चे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण शंकर घाग यांना नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन चा मानाचा समजला जाणारा आंतरराज्य आदर्श प्राचार्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

गोवा कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यातील निवडक व्यक्तींची निवड आंतरराज्य पुरस्कार वितरण समितीने करून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. कर्नाटकातील बेळगाव- चिक्कोडी येथे भारताच्या केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनुर व बेळगावचे खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला.

त्या प्रसंगी कोल्हापूरचे महापौर रावजी शिंगाडे,माळशिरस चे नगराध्यक्ष अप्पासाहेब देशमुख,अरविंद घट्टी जिल्हा कमांडंट होम गार्ड डिपार्टमेंट कर्णाटक सरकार,आदी.मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

अरुण घाग हे रयत शिक्षण संस्थेमध्ये गेली 33 वर्षे अविरतपणे अध्यापनाची सेवा करत आहेत. महाराष्ट्रातील गोरगरीब कष्टकरी, शेतकरी आणि बहुजन समाजातील लोकांच्या झोपडीपर्यंत ज्ञानाची गंगा पोहोचविण्यासाठी थोर शिक्षण महर्षी डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून महाराष्ट्रात शिक्षणाची क्रांती घडवून आणली.

कर्मवीरांच्या विचारांचा वसा घेऊन तसेच भूमिपुत्रांचे कैवारी, जासई गावचे सुपुत्र व या विद्यालयाचे संस्थापक लोकनेते दि. बा. पाटील यांच्या विचारावर श्रद्धा ठेवून जासई येथे अरुण घाग हे प्राचार्य म्हणून काम करत आहेत. त्यांनी या शैक्षणिक संकुलाच्या विकासासाठी जे योगदान दिले आहे तसेच त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची नोंद हा पुरस्कार देताना घेण्यात आली आहे.

या शाळेत त्यांनी आपल्या कारकीर्दीत विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सोयीसाठी पाणपोईची उभारणी केली.विद्यालयाच्या प्रांगणात स्टेज उभारणी केली आहे.अटल टिंकरिंग लॅब ची उभारणी केली, प्रशासकीय कामासाठी प्रशस्त कार्यालय निर्माण केले, विद्यालयाच्या वाढत्या विद्यार्थी संख्येनुसार सुरू असलेल्या इमारतीचे काम वेगाने पूर्ण केले. त्याच बरोबर सर्व शालेय परिसर स्वच्छ सुंदर व शैक्षणिक वातावरण निर्माण करून आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने शाळेची शैक्षणिक वाटचाल विकासाकडे सुरू ठेवली आहे.

या शाखा विकासाच्या कामात त्यांना शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, कामगार नेते आणि भारतीय मजदूर संघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळत आहे तसेच रयत सेवक संघाचे महाराष्ट्र समन्वयक नूरा शेख यांचे विशेष सहकार्य मिळत आहे.शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन अरुण जगे, शिक्षक-पालक संघ, माजी विद्यार्थी संघ, व सर्व सेवक वर्ग या सर्वांना एकत्र घेऊन शाळेच्या प्रगतीसाठी ते सतत प्रयत्नशील आहेत.

अरुण घाग यांना यापूर्वी रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार, डॉ.सर्वपल्ली राधकृष्णन् पुरस्कार ,उत्कृष्ठ रयत सेवक पुरस्कार,आदर्श प्राचार्य आचार्य शिरोमणी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित केले आहे. इ.10वी बोर्डाच्या पातळीवर मॉडरेटर व पेपर सेटर म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ पुणे च्या भूगोल विषय समितीवर त्यांनी तज्ञ विषय शिक्षक म्हणून पाठ्यक्रम निर्मितीत समीक्षक म्हणून काम केले आहे. ते शिस्तप्रिय व क्रियाशील व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. त्यांच्या या गुणांची कदर करून रयत शिक्षण संस्थेने त्यांना लाइफ वर्कर मंडळावर सदस्य म्हणून घेतले आहे.तसेच रयत सेवक वेल्फेअर फंड व कर्मवीर विद्या प्रबोधिनी कमिटीवर सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे.

त्यांच्या या सन्मानाबद्दल जासई दहागाव विभागातील शिक्षणप्रेमी नागरिक,ग्रामस्थ,शिक्षक – पालक व सर्व विद्यार्थी वर्गाने त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.