रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतकडून आद्य संतसाहित्य संमेलन भरणार !
सिटी बेल • रसायनी • राकेश खराडे •
रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या शरद क्रीडा आणि सांकृतिक प्रतिष्ठानतर्फे वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याबरोबरच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर यांचे जन्मगाव असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव येथे आद्य संतसाहित्य संमेलन आणि कारागृहातील कैद्यांसाठी भजनस्पर्धा घेण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय बैठकीत पुणे येथे घेण्यात आला.
यावेळी राज्यातील सर्व जिल्हातील पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली असताना रायगड जिल्ह्याचे प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव राकेश खराडे उपस्थित होते.राज्यातील पदाधिकाऱ्यांनी आपापला परिचय करून दिला.
प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा तसेच जिल्हापातळीवर कार्यालय आणि तालुका पातळीवर शाखा सुरू करण्याचा निर्धार करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे निमंत्रक, संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया होते. विश्वस्त शेखर पाटील, संदीप राक्षे, उपाध्यक्ष नंदकुमार बंड,हरिष उथापे आदी उपस्थित होते.
पर्यावरणपूरक उपक्रम घेण्याबाबत बैठकीत सूचना करण्यात आली. त्या अनुषंगाने 2 जुलै 2022 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात वृक्षारोपण कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
वृक्षारोपण करताना कडूलिंब, वड, पिंपळ या देशी वृक्षांना प्राधान्य देण्याचे ठरले. तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर क्रीडा स्पर्धा घेण्याबाबतही चर्चा झाली.तसेच बंदिजनांसाठी कार्यशाळा, गृहिणींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ठरले.

आजची पिढी गोंधळेल्या अवस्थेत आहे. तरुणांना योग्य दिशा दाखविण्यासाठी संत साहित्याच्या माध्यमातून त्यांच्यातील गोंधळाचे वातावरण दूर केले जाऊ शकते त्यामुळे संतसाहित्य संमेलन घेण्यावर भर देण्यात आला. औरंगाबादमधील पदाधिकार्यांनी संमेलनाची संपूर्ण जबाबदारी घेण्याची तयारी दर्शविली. आजच्या तरुणाईला भेडसावणार्या समस्या सोडविण्यासाठी युवा जागर शिबिर घेण्याची सूचना यावेळी करण्यात आली.
येत्या वर्षभरात प्रतिष्ठानतर्फे कशा पद्धतीने उपक्रम राबविले जावेत याविषयी विवेचन करून प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, वर्षभरात ध्येय निश्चित करून कार्य करा, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रतिष्ठानच्या माध्यमातून कसे पोहोचता येईल यादृष्टीने प्रयत्न करा.
कारागृहातील कैद्यांच्या मनातील नैराश्याची भावना दूर व्हावी, वाईट विचारांपासून त्यांना प्रवृत्त करता यावे या उद्देशाने त्यांच्यासाठी भजन स्पर्धा घेण्याचा विचार आहे. त्या दृष्टीने शासनाशी पत्रव्यवहार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविणारे कार्यक्रम प्रतिष्ठान घेणार असून गावपातळीवर प्रतिषृठानचा नामफलक दिसावा अशी अपेक्षा लक्ष्मि कांत खाबिया यांनी व्यक्त केली.








Be First to Comment