पोलादपूर क्षुधाशांती उपहारगृहाचे संचालक मधुसूदन महादेव तथा मामा खरे यांचे निधन
सिटी बेल| पोलादपूर | शैलेश पालकर |
तालुक्यातील ख्यातनाम हॉटेल व्यावसायिक मधुसूदन महादेव तथा मामा खरे यांचे काल बुधवार, दि. 02 फेबु्रवारी 2022 रोजी दुपारी 1 वाजता अल्पआजाराने निधन झाले. पोलादपूर शहरातील छ.शिवाजी महाराजांच्या पुतळयाच्या स्थापनेसाठी सदगुरू दिगंबरदास वालावलकर चॅरिटेबल ट्रस्टमार्फत यशस्वी प्रयत्न करणाऱ्या मामा खरे यांनी आयुष्यभर अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत.
महाबळेश्वर आणि कोकणात जाणाऱ्या पर्यटक आणि प्रवासी वर्गासाठी विश्वसनीय शाकाहारी मराठमोळा नाष्टा आणि जेवण देणाऱ्या क्षुधाशांती उपहार गृहाने गेल्या चाळीसहून अधिक वर्षापासून नावलौकिक तसेच आपुलकी निर्माण केली आहे. या उपहारगृहामध्ये अनेक चित्रपट अभिनेते, गायक, राजकीय व्यक्ती, पत्रकार, उद्योगपती तसेच विचारवंतांनी आवर्जून भेट दिली असून अनेक कुटूंबियांनी या उपहारगृहातील नाष्टा आणि शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी पिढयानपिढया या उपहारगृहाशी नाते जोडले आहे. यामुळे मधुसूदन महादेव तथा मामा खरे यांचे नांव कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात सर्वदूर सर्वशृत झाले आहे. अनेक रूग्णांना डेरवण येथील वालावलकर ट्रस्टच्या रूग्णालयामध्ये उपचार करण्यासाठी मामा खरे यांच्या चिठ्ठीचा योग्य उपयोग होऊन प्राण वाचल्याचे प्रसंग सर्वज्ञात आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या मामा खरे यांचे राहत्या घरी निधन झाल्याची दुखद बातमी समजताच पोलादपूरवासियांनी सायंकाळी दुकाने व व्यवसाय बंद ठेवून अंत्ययात्रेमध्ये सहभागी होऊन श्रध्दांजली वाहिली.








Be First to Comment