Press "Enter" to skip to content

विविध व्याधींवर भारतीय संगीत चिकित्सा अत्यंत प्रभावी ! – शॉन क्लार्क

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘आरोग्यासाठी संगीत चिकित्सा’ या विषयावर संशोधन सादर !

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

‘आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध असणारे संगीत व्यक्तीला रोग बरा होण्यास आणि औषधांवरील अवलंबित्व अल्प करण्यास साहाय्य करू शकते का ?’, हे जाणण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने उच्चरक्तदाब (हायपरटेन्शन) असलेल्या व्यक्तींवर काही चाचण्यांद्वारे संशोधन करण्यात आले. या संशोधनातून आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक नाद अथवा संगीत व्यक्तीला विविध आजारांवर मात करण्यास साहाय्य करू शकतात. तसेच विदेशी संगीत चिकित्सेपेक्षा भारतीय संगीत चिकित्सा अधिक प्रभावी असल्याचे संशोधनात आढळून आले, असे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी केले. ते ‘www.hinduscriptures.com’ या संकेतस्थळाने आयोजित केलेल्या ‘आरोग्यासाठी संगीत चिकित्सा’ या विषयावरील फेसबुक ‘वेबिनार’मध्ये बोलत होते.

या वेबिनारचे आयोजन संकेतस्थळाच्या संस्थापिका आणि ‘द हिंदू कल्चर अँड लाईफस्टाईल/द वेज सफारी’ या ग्रंथाच्या लेखिका श्रीमती वैशाली शहा यांनी केले होते. या वेळी श्री. क्लार्क यांनी ‘संगीताचा व्यक्तीवर आध्यात्मिकदृष्ट्या होणारा परिणाम’ अभ्यासण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली केलेले संशोधन सादर करण्यात आले.

संगीताचा व्यक्तीवर होत असलेला परिणाम अभ्यासण्यासाठी उच्च रक्तदाब असलेल्या 5 व्यक्तींना शास्त्रीय संगीतातील राग ‘गोरखकल्याण’चे थेट सादरीकरण तासभर ऐकण्यास बसवले. काही संगीततज्ञांच्या मते गोरखकल्याण हा राग रक्तदाब कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. राग सादर करणारे कलाकार श्री. प्रदीप चिटणीस हे उच्च आध्यात्मिक पातळीचे आणि आध्यात्मिकदृष्ट्या सकारात्मक होते. या प्रयोगाच्या 48 तास आधी वैद्यकीय तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती काळजी घेऊन या चाचणीत सहभागी व्यक्तींची उच्च-रक्तदाबाची औषधे बंद करण्यात आली होती. ‘राग गोरखकल्याण’ ऐकण्यापूर्वी आणि नंतर सहभागी व्यक्तींचा रक्तदाब मोजण्यात आला, तसेच ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ (यू.ए.एस.) यंत्राद्वारे त्यांच्या सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेवर संगीताचा होणारा परिणाम अभ्यासण्यात आला. ‘राग गोरखकल्याण’ ऐकल्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी सर्वांचा रक्तदाब मोजण्यात आला. त्या वेळी 5 पैकी 4 जणांचा रक्तदाब संगीत ऐकण्यापूर्वीच्या त्यांच्या रक्तदाबाच्या तुलनेत घटला होता. एकाचा रक्तदाब सामान्य होता. ‘वाढलेल्या रक्तदाबामध्ये घट झाली आणि 72 तास औषधोपचार न करताही ती टिकली’, हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. संगीत ऐकल्यानंतर व्यक्तींची नकारात्मक ऊर्जा सरासरी 60 टक्के घटली आणि त्यांच्या सकारात्मक ऊर्जेत सरासरी 155 टक्के वाढ झाली. अशा प्रकारच्या संगीताचा परिणाम दर्शवणार्‍या अन्य चाचण्यांविषयी विस्तृत माहितीही श्री. क्लार्क यांनी या वेळी दिली.

या संशोधनामध्ये ब्रिटीश बँड ‘मार्कोनी युनियन’चे ‘वेटलेस’ असलेले रिलॅक्स म्युझिकही ऐकवले. या प्रयोगानंतरही दोघांचा रक्तदाब कमी झाला, मात्र दोघांच्या नाडीचे ठोके वाढले. तसेच यू.ए.एस्. यंत्राद्वारे केलेल्या चाचणीत त्यांच्या नकारात्मकतेत सरासरी 53 टक्के वाढ झाली, तर एकाची सकारात्मक प्रभावळ 53 टक्क्यांनी घटली आणि दुसर्‍याची सकारात्मक प्रभावळ पूर्णपणे कमी झाली. यातून असे लक्षात आले की, भारतीय संगीत आणि नाद चिकित्सेतून व्याधी कमी होतात, त्यासह व्यक्तीची सकारात्मक प्रभावळीही वाढते. तर विदेशी संगीतामुळे व्याधी जरी कमी होत असली, तरी सकारात्मकता कमी होऊन नकारात्मकतेत वाढ होते, असे दिसून आले. या संशोधनातून संगीताचा व्यक्तीवर केवळ मानसिकच नाही, तर आध्यात्मिक स्तरावरही परिणाम होतो. संगीताचा खरा लाभ मिळवण्यासाठी व्यक्तीने आध्यात्मिकदृष्ट्या शुद्ध संगीत ऐकणे महत्त्वाचे आहे. संगीत चिकित्सा (म्युझिक थेरपी) ही वैद्यकीय शास्त्रांनी विचारात घेतली पाहिजे; कारण त्यासाठी काहीही खर्च येत नाही; परंतु त्याचे लाभ पुष्कळ आहेत, असेही श्री. क्लार्क यांनी सांगितले. या संशोधनाचे सादरीकरण ‘www.hinduscriptures.com’ या संकेतस्थळाच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.