Press "Enter" to skip to content

रोटरी क्लब ऑफ वाईच्या वतीने शास्त्रीय संगीत गायनाची मैफिल

रायगड भूषण पंडित उमेश चौधरी यांच्या राग ‘यमन’ च्या अनोखी गायन किमयाने शास्त्रीय संगीत मैफलीत रंगत

सिटी बेल | वाई | प्रतिनिधी |

आग्रा घराण्याचे प्रख्यात गायक रायगड भूषण पंडित उमेश चौधरी यांच्या राग ‘यमन’ च्या अनोखी गायन किमयाने शास्त्रीय संगीत मैफलीत रंगत आणली. पंडित सदाशिव पवार स्मृतिदिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ वाईच्या वतीने वाई मधील लोकमान्य टिळक संस्थेचे सभागृहात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक व रायगडचे सुपूत्र पंडित उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय संगीत गायनाची मैफिल संपन्न झाली. यावेळी त्यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.

पंडित उमेश चौधरी यांनी शिक्षणात पदवीधर, अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची ’विशारद’ पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. दूरदर्शन, आकाशवाणी तसेच विविध कार्यक्रमात त्यांनी आपल्या सुरमयी कलेने रसिकांना मंत्रमुग्ध केले आहे. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने सुरु असलेल्या मासिक संगीत सभेच्या माध्यमातून पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी शेकडो कलाकारांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. देशभरात विविध ठिकाणी संगीताचे कार्य करत असताना त्यांनी आपल्या कलेची छाप सोडली आहे, त्यामुळे त्यांचा भीमसेन जोशी गानगंधर्व, रायगड भूषण, रायगड गौरव असे आणि बरेच पुरस्काराने गौरव झाला आहे. त्यांच्या गायनाने संगीत मैफिल प्रफुल्लीत होत असते म्हणून वाई रोटरी क्लबने या संगीत मैफिलीचे आयोजन केले होते.

राग ‘यमन’ची विशेषता म्हणजे संगीत शास्त्र प्रणालीला धरून चालणारा राग असून गायकाच्या कल्पकतेतून प्रकटणाऱ्या विविध स्वर समूहांचा रंगोत्सव असतो. या मैफलीच्या निमिताने उस्ताद अस्लम खान यांच्या मार्गदर्शनाची मांडणी पंडित उमेश चौधरी यांनी चांगल्या प्रकारे मेहनतीने सिद्ध केली हे यावेळी पदोपदी जाणवत होते. खयाल विलंबित एकतालातली बंदिश, मध्यलय रचना “सखी येरी आली पियाबिना व संगीत सम्राट तानसेन जी समर्पित तरणा बहरदारच होते. बंदिशी प्राचीन परंपरेतली असल्यामुळे संगीत प्रेमीजन जवळ जवळ भारावूनच गेले होते. तद नंतर खास संगीत प्रेमीजनांच्या आग्रहास्तव संत सावता माळी, संत गोरा कुंभार व संत तुकाराम महाराजांच्या अभंगांचा नादब्रह्ममय प्रसादच संगीत प्रेमी जणांना यावेळी मैफलीतून मिळाला.

साथ संगत कलाकारांत संवादिनीवर सुरेश फडतरे, पखवाज साथ किरण भोईर तर तबला साथ निषाद पवार यांची होती. तसेच मंगेश चौधरी व अक्षय चौधरी यांची गायन साथ अधोरेखित करणारी होती. त्याचबरोबर या कार्यक्रमात रोटेरिअन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ, रोटेरिअन डॉ. रुपाली अभ्यंकर, रोटेरिअन डॉ. प्रेरणा ढोबळे, रोटेरिअन दिपक बागडे व उस्ताद अझीम खान यांची उपस्थिती संगीत मैफलीची शान वाढविणारीच होती. कार्यक्रमाच्या प्रारंभी सागर कांबळे व यश बागुल या दोन युवकांनी तबला जुगलबंदी श्रवणीय सादर केली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.