सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
पुण्यस्मरण त्यांच होतं ज्यांनी आपल्या जीवनात पुण्य कमावले आहे.ज्यांनी जीवनात पुण्यधर्म केले आहे.
अर्थात माणसांकडून नकळत पाप घडतात.पुण्यधर्म करण्यासाठी अट्टाहास व प्रयत्न करावा लागतो.पुण्य करण्याकरिता जीवनात सदाचार संपन्नता असणं अत्यंत आवश्यक आहे. सदाचार संपन्ननता जीवनात नसेल तर तो पुण्यकर्म करू शकत नाही.संत वाङ्मय याचा जर बारकाईने अभ्यास केला तर त्यामध्ये असं लिहलं आहे जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाला मरेपर्यंत जगायचा हक्क आहे.पण ते जगणं सदाचार संपन्नतेच असावं तर त्या जगण्याला अर्थ.असे निरूपण सुप्रसिद्ध कीर्तनकार आणि प्रवचनकार आनंद महाराज खंडागळे यांनी केले.
आसरोटी येथील सुपरिचित मातोश्री ह.भ.प.वैकुंठवासी गंगाबाई राघो ठोंबरे यांच्या नुकत्याच झालेल्या प्रथम पुण्यस्मरण दिनी ते बोलत होते.पत्रकार तथा रोहिदास कोचिंग क्लासेसचे संचालक तथा शिवकार्य ट्रेकर्सचे संस्थापक रोहिदास ठोंबरे सर यांच्या त्या मातोश्री होत्या. यावेळी त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी श्री भावार्थ ज्ञानेश्वरी मधील नवव्या अध्यायातील पंचविसाव्या क्रमांकाचा श्लोक वर त्यांनी निरूपण दिले.
पुढे त्यांनी सांगितले की, जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाने जगावे पण कसं जगावं हे संतांनी आम्हांला शिकवले.तुका म्हणे द्यावी सतकीर्ती. माणसानं असं जगावं की त्याच्या कीर्तीचा सुंगध दरवळत राहिला पाहिजे. किर्तीमध्ये दोन प्रकार आहेत.एकाला सतकीर्ती म्हणतात व एकाला अपकीर्ती म्हणतात.अपकीर्ती करताना प्रयत्न करावे लागत नाही.पण सतकीर्ती करताना जीवन पणाला लावावं लागतं. सतकीर्ती करणं एवढं सोप्प नाही.मला सांगा पास होण्याकरिता अभ्यास करावा लागतो का नापास होण्याकरिता ? अभ्यास पास होण्याकरिता करावा लागतो.पेपर कोरा टाकला की लगेच निकाल लागतो.अपकीर्ती करताना प्रयत्न करावे लागत नाही.सतकीर्ती करताना प्रयत्न करावे लागतात.
आपण जर इतिहासाचे अवलोकन केले,तर प्रभू रामचंद्रांची सतकीर्ती व रावणाची अपकीर्ती. भगवान श्री कृष्णाची सतकीर्ती व कंसाची अपकीर्ती.अगदी अलीकडे सांगायचं म्हटलं तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची सतकीर्ती व म्हंबाजी बुवा यांची अपकीर्ती.प्रयत्न सतकीर्ती साठी करावं लागतं. आणि असं माणसाने जगावं शेवटच्या टोकापर्यंत.की आपल्या कीर्तीचा सुगधं दरवळत राहिला पाहिजे आणि त्या जगण्याला सदाचार संपन्नतेचे वेष्टन असावं लागतं.असं जीवन वैकुंठवासी आई गंगाबाई राघो ठोंबरे यांनी आपलं संपूर्ण जीवन सदाचार संपन्नतेमध्ये जगली.वारकरी संप्रदायाच्या जननी होत्या.अशा अमृततुल्य वाणीतून त्यांनी सर्व भाविक भक्तांना मंत्रमुग्ध केले.यावेळी वारकरी संप्रदायातील मंडळी,ग्रामस्थ, महिला वर्ग व तरुण वर्ग,बालगोपाल वर्ग उपस्थित होता.
Be First to Comment