Press "Enter" to skip to content

सिटी बेल नवरात्रोत्सव २०२१

नवसाला पावणारी कर्जत येथील भिसेगावची श्री अंबे भवानी : वाचा या देवीची चमत्कारिक कथा

सिटी बेल| कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत रेल्वे स्थानका पासून अगदी दोन – तीन मिनिटांच्या अंतरावर असलेल्या भिसेगाव मध्ये श्री अंबे भवानी मातेचे मंदिर आहे. नवसाला पावणारी जागृत देवस्थान अशी या स्थळाची प्रचीती आहे.

या देवी बद्दल उपलब्ध असलेली माहिती अशी की, कर्जत नगरपरिषद हद्दीत असलेले भिसेगाव हे गाव भिसे खिंडीच्या पायथ्याशी आहे. पूर्वी या ठिकाणी खूप जंगल होते. व्यापारी वर्ग व्यापारासाठी मुंबई – पुण्याकडे जातांना याच खिंडीच्या मार्गाने जात. हे व्यापारी खिंडी जवळ असणाऱ्या विहिरीजवळ रात्री मुक्काम करून सकाळी पुढील प्रवासाला निघत. डोंगर माथ्यावर आदिवासी लोकांची वस्ती होती.

एके दिवशी एका गुजराथी व्यापाऱ्याला मुक्कामाला असतांना स्वप्न पडले. स्वप्नात देवीने दर्शन दिले. ’मी या विहिरीजवळ असलेल्या वारुळात आहे. मला त्यातून बाहेर काढ. माझ्या सोबतीला एक काळा नाग आहे. तो तुम्हाला काही करणार नाही. या स्वप्नाकडे लक्ष न देता तो व्यापारी तेथून पुढे निघून गेला. काही दिवसांनी पुन्हा या ठिकाणी तो व्यापारी मुक्कामास आला असता त्याला तसाच दृष्टांत झाला. हा सर्व वृत्तांत त्याने आपल्या व्यापारी मित्रांना सांगितला.

या सर्व व्यापारी वर्गाने मिळून स्वप्न शोधण्याचे ठरविले. त्यांनी डोंगर माथ्यावर राहणार्या आदिवासींना मदतीला बोलून घेतले. सार्वजण वारूळ फोडण्यासाठी जमले असता त्या वारुळातून काळा नाग बाहेर आला व कुणालाही काहीही न करता बाहेर निघून गेला. त्यानंतर आदिवासी लोकांनी वारूळ फोडले. तो काय आश्चर्य खरोखर देवीची सुंदर रेखीव मूर्ती त्यातून बाहेर पडली. ती मूर्ती पाहून सर्वांना आनंद झाला. आदिवासी व व्यापारी यांनी सावली म्हणून देवीच्या डोक्यावर छप्पर तयार केले. तेंव्हा पासून व्यापारी येता जाताना देवीची पूजा करून दर्शन घेऊन आपापल्या कामाला जात असत.

ही देवी कोणती ? असा प्रश्न कुतुहलापोटी लोकांमध्ये निर्माण होऊ लागला. तेंव्हा ज्या आदिवासी माणसाने वारुळास प्रथम हात लावला त्याच्या स्वप्नात जाऊन देवीने सांगितले की, मी गुजराथ येथील अबुच्या पहाडावरील श्री अंबे भवानी आहे. तेंव्हा पासून या देवीला श्री अंबे भवानी माता असे लोक म्हणू लागले आणि भक्ती भावाने तिच्या भजनी पूजनी लागले. ग्रामस्थांनी एकत्र येऊन मंदिराचा जीर्नोद्धार केला असून आता मोठा सभा मंडप उभारून गोर गरीब लोकांच्या शुभ कार्याची व्यवस्था केली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.