Press "Enter" to skip to content

बेलपाडा स्मशानभुमीतील नित्कृष्ट दर्जाच्या कामाबद्दल शिवसेनेची आयुक्तांकडे तक्रार

शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी केली निकृष्ट कामाची पोलखोल

सिटी बेल | पनवेल | वार्ताहर |

खारघर शहरातील बेलपाडा स्मशानभुमीच्या दुरुस्तीचे काम पालिकेमार्फत हाती घेण्यात आले आहे. मात्र संबंधित दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी थेट पालिका आयुक्तांकडे केली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या ठेकेदारावर कारवाईची मागणी घरत यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

पालिकेच्या माध्यमातुन मेसर्स आर वी जगे या कंत्राटदाराला देण्यात आलेले आहे.संबंधित काम पूर्ण करण्याची मुदत दि.26 सप्टेंबर रोजी संपुष्ठात आली असताना देखील कंत्राटदाराला हे काम वेळेवर पूर्ण करता आलेले नाही.स्मशानभूमीत अद्यापही बहुतांशी काम अपूर्ण आहे.भर पावसात स्मशानभूमीत रंगरंगोटी करण्यात आलेली आहे.तसेच स्मशानभूमीत सर्वत्र कचरा ,प्लास्टिक बॉटल्स ,झाडे झुडपे वाढलेली आहेत.स्मशानभूमीत बसण्यासाठी असलेली कडप्पे देखील तुटलेली आहेत.

पालिकेने या स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी 5 लाख 58 हजारांची निविदा काढली होती.या निविदेला प्रतिसाद देताना मेसर्स आर वी जगे या कंत्राटदाराने सुमारे 35.5 न्यूनतम दराने हे काम घेतले.त्यामुळे या कामाची रक्कम सुमारे 3 लाख 60 हजारांवर आल्याने कामाचा दर्जा कसा टिकणार ? याबाबत प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे.मुदत संपुन देखील कंत्राटदाराला काम पूर्ण करता आले नसताना देखील पालिकेने कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केली नसल्याने पालिकेच्या बांधकाम विभागातील अधिकार्‍यांचे तर या निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या कंत्राटदाराला वरदहस्त तर नाही ? असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी या निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केली आहे.

अर्धवट प्लास्टर केलेल्या जागेवर रंगरंगोटी केल्याने दुरुस्तीच्या नावाने थुकपट्टी लावणार्‍या कंत्राटदारावर कारवाईची मागणी जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली आहे.अशाप्रकारे कामात चालढकल करणार्‍या कंत्राटदारांवर कारवाई केल्यास भविष्यात पालिका क्षेत्रात इतर ठिकाणच्या विकासकामांमध्ये अशाप्रकारे निकृष्ट दर्जाचे काम होणार नसल्याचे घरत यांचे म्हणणे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.