गणराया
भाद्रपदाच्या चतुर्थ दिनी
बाप्पा तू यावे, बाप्पा तू यावे
मखर सजविले तुजसाठी बघ
बसूनी तू घ्यावे.
मनापासुनी तुला पूजितो
सुखकारक देवा, सुखकारक देवा
भावभक्तीने हात जोडितो
आशीर्वच द्यावा.
रक्तवर्णी जास्वंद तुला प्रिय
दुर्वांकूर हिरवे, दुर्वांकूर हिरवे
रुप तुझे सुखवी नयनाला
प्रसन्नसे बरवे.
लाडू, मोदक नैवेद्य तुला
स्वीकारी देवा, स्वीकारी देवा
वरदहस्त तो तुझ्या कृपेचा
आम्हाला मिळावा.
लंबोदर तू , शूर्पकर्ण तू
गौरीच्या तनया, गौरीच्या तनया
विद्याधिपती, विघ्नेश्वर तू
बाप्पा मोरया.
मूषकावरी बैसूनी येशी
जगता ताराया, जगता ताराया
एकदंत तू, वक्रतुंड तू
गणपती गणराया.
सौ. अपर्णा साठे, नवीन पनवेल
Be First to Comment