सिटी बेल | मुंबई |
भारतीय जनता पार्टीने त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांना शिवसेनेवर उठसूट आगपाखड करण्यासाठीच ठेवले आहे का अशी शंका आता निर्माण झाली आहे. स्वतःला जगातील मोठा पक्ष अशी ख्याती मिरवणाऱ्या भाजपचे हात आता हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेल्या वास्तूवर हल्ला करण्यासाठी शिवशिवत आहेत पंरतु हे शिवशिवणारे हात शिवसैनिक मुळासकट उखडून टाकतील असा इशारा शिवसेना आमदार व प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी दिला आहे.
माननीय हिंदुहृदयसम्राट मा बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन निवडणुका जिंकलेत आणि त्यांनीच निर्माण केलेल्या शिवसेना भवनावर चाल करून भ्याड हल्ला करण्याची भाषा काल भाजपच्या एका कार्यक्रमात प्रसाद लाड यांनी केली व चहुबाजूनी टीका झाल्यावर ते माफीवीर सुद्धा झाले परंतु शिवसेना भवन तोडून टाकण्याचे व्यक्तव्य करून प्रसाद लाड यांनी मा. बाळासाहेब ठाकरे यांचा जाहीर अपमान केला आहे त्यांनी समस्त शिवसैनिकांची लिखित माफी मागावी अशी मागणी डॉ. मनीषा कायंदे यांनी आज केली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या या असल्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी शिवसेनेच्या रणरागिणी महिला आघाडी सक्षम आहे. सवंग प्रसिद्धीसाठी शिवसेनेवर आणि शिवसेना भवनावर बोलले की त्यांना प्रसिद्धी मिळते असे मत डॉ मनीषा कायंदे यांनी व्यक्त केले. शिवसेना भवन हे आम्हा शिवसैनिकांसाठी काही केवळ कार्यालय नसून ते आमचे मंदिर आहे.आमच्या मंदिराकडे कोणी वाकड्या नजरेने देखील पाहिले तर अशा लोकांचे तंगड तोडून द्यायला आम्ही कोणत्या आदेशाची वाट पाहणार नाही अशा आशयाचे ट्विट काल डॉ. मनीषा कायंदे यांनी केले होते.








Be First to Comment