Press "Enter" to skip to content

गणपतराव देशमुख यांचे निधन : चार पिढ्यांचा नेता हरपला

आबांच्या निरोपाला हजारोंचा जनसागर लोटला : वाचा गणपतराव देशमुख यांच्या विषयी बरंच काही !

सिटी बेल | सांगोला |

शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन झालं आहे. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सोलापुरातील खासगी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९४ वर्षाचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून गणपतराव देशमुख यांच्यावर उपचार सुरु होते. शेतकरी कामगार पक्षाचे ते ज्येष्ठ नेते होते. दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली वाहीली आहे. आज सांगोला येथे निघालेल्या गणपतराव देशमुख यांच्या अंत्ययात्रेला हजारोंचा जनसागर लोटला आहे.

दरम्यान, गणपतराव यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. तर राजकारणतला साधेपणा हरपला अशा भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केल्या आहेत.

शरद पवार म्हणाले, “कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांच्या निधनाचे वृत्त दुःखद आणि क्लेशदायक आहे.महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल”

“लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज आपण गमावला आहे”, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या.

गणपतराव देशमुख यांच्या विषयी बरंच काही !

गणपतराव देशमुख यांचा जन्म १९२७ सालचा. मोहोळ-पंढरपूर रस्त्यावर असलेलं पेन्नूर हे त्यांचं गाव. मॅट्रिकचे शिक्षण पुण्यात घेतल्यानंतर गणपतराव देशमुख यांनी पुण्यात पुढील शिक्षण पूर्ण केलं. याच काळात त्यांचा स्वातंत्र्य चळवळीकडे कल वाढला. काँग्रेस विचारसरणीच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचे शंकरराव मोरे, नाना पाटील यासारख्या कार्यकर्त्यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि ते या विचारधारेकडे झुकले.

विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे मोठे बंधु अप्पासाहेब पवार आणि गणपतराव देशमुख रूममेट होत. तर स्वातंत्र्यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल टाकत १९६२ची विधानसभा निवडणूक लढवली आणि ते सांगोल्याचे आमदार झाले. त्यांची ही वाटचाल दोन निवडणुका सोडल्या तर सुरूच आहे. आमदार होऊन पहिल्यांदाच विधानसभेत गेलेल्या गणपतरावांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर केलेल्या भाषणाबद्दल यशवंतराव चव्हाण यांनीही त्यांचं कौतूक केलं होतं.

गणपतराव देशमुखांनी महाराष्ट्राची पहिली विधानसभा निवडणुक लढवली आणि जिंकलेही. त्यानंतर दोन निवडणूका सोडल्या तर तब्बल ११ वेळा ते आमदार झाले. म्हणजे ५० वर्षांहून अधिक काळ ते विधानसभेचे सदस्य राहिले. या काळात त्यांनी दोन वेळा मंत्री म्हणून काम केलं. विशेष म्हणजे लोकांच्या हिताची कामं करण्यासाठी त्यांनी सातत्यानं पुढाकार घेतला.

एस टी बस आणि गणपतराव !

एकाच पक्षात राहून ११ वेळा आमदार झालेल्या गणपतराव देशमुख यांनी आमदारकी कधीही डोक्यात जाऊ दिली नाही. सहकाराबरोबर तालुक्याच्या पाण्यासाठी आणि इतर विकास कामांसाठी ते हिरारीने पुढाकार घेतला. विरोधी पक्षात राहूनही कामं करता येऊ शकतात हे गणपतराव देशमुखांनी दाखवून दिले. मंत्रीपदं गेल्यानंतर लागलीच शासकीय गाड्यांचा त्याग करणाऱ्या गणपतरावांनी आयुष्यभर एसटीनेच प्रवास केला. आमदारकीचा कुठलाही रूबाब न दाखवता लोकसेवेचं काम त्यांनी केलं. वयाच्या ९४ व्या वर्षी गणपतरावांनी निवडणूक (२०१९ ची विधानसभा निवडणूक) न लढवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी लोक उमेदवारी अर्ज भरेपर्यंत लोक त्यांच्याकडे निवडणूक लढवावी असा हट्ट धरून बसले होते. इतकं प्रेम जनतेनं त्यांच्यावर लोकप्रतिनिधी म्हणून केलं. आमदारकीसाठी पक्ष सोडणाऱ्या आजच्या राजकीय काळात गणपतराव देशमुखांनी एका पक्षात राहुन निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या. अगदी मोदी लाटेतही आबासाहेबांना लोकांनी आमदार केलं. पण आमदारकी त्यांनी कधी डोक्यात जाऊ दिली नाही. त्यांनी मातीशी नाळ कायम ठेवली. त्यामुळेच एका पक्षात राहून ते तब्बल ५५ वर्ष ते महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेले.

कार्यकर्ता बॅनरवर झळकला तर दुचाकीशिवाय खाली उतरत नाही. आणि जर एखाद्या पक्षाचा साधा नेता जरी असला तर तो चारचाकी गाडीच्या खाली फिरत नाही. पण, या सर्वांना ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख अपवाद होते. मुंबईची विधानसभा असो किंवा नागपूरचे हिवाळी अधिवेशन गणपतराव देशमुख हे ठरल्याप्रमाणे एसटी महामंडळाच्या बसनेच यायचे. उच्च विचार, साधी राहणी हे प्रत्येकाला जमतेच असं नाही. पण गणपतराव देशमुख हे आपल्या विचारांना पक्के होते. तब्बल 11 वेळा आमदार म्हणून निवडून आले. पण, त्यांनीही आमदारकीचा मोठेपणा मिरवला नाही. गरीब, शोषितांसाठी त्यांनी उभे आयुष्य खर्ची घातले.

गणपतराव देशमुख हे मुंबईला महामंडळाच्या एसटी बसनेच यायचे. २०१७ मध्ये नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाला सुद्धा गणपतराव देशमुख एसटी बसनेच आले होते. पहिल्या टर्मपासून त्यांनी क्रम मोडला नाही, तो शेवटपर्यंत कायम राखला. गणपतराव देशमुख हे राजकारणात येण्यापूर्वी वकिली करत होते.

या माध्यमातून लोकांना न्याय देता देता त्यांची शेतकरी कामगार पक्षाशी काम करण्याची जवळीक झाली. 1950 पासून ते शेकापचे सक्रिय कार्यकर्ते झाले. 1962 साली गणपतराव देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. इथूनच त्यांची राजकीय कारकीर्द बहरू लागली.

पहिली निवडणूक लढवताना दुष्काळी सांगोल्यातील जनतेला पाणी मिळाले पाहिजे, या मागणीसाठी त्यांनी लढाई सुरू केली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. 1972 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण दोन वर्षांतच झालेल्या पोटनिवडणुकीत गणपतराव पुन्हा निवडून आले ते सलग 1995 पर्यंत.

याकाळात 1977 साली त्यांनी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद सांभळले होते. पुलोद काळात 1978 साली ते पहिल्यांदा राज्यमंत्री मंडळात सहभागी झाले. त्यानंतर 1999 साली पुन्हा मंत्री झाले. याकाळात त्यांनी दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कायम लढा दिला.

त्यांच्या प्रयत्नांमुळेच दुष्काळी सांगोल्यात टेंभू आणि म्हैसाळ योजनेचे पाणी पोहचले. 1995 च्या पराभवानंतर गणपतराव देशमुख यांनी 1999 पुन्हा निवडून आले. 2014 पर्यंत त्यांनी 11 वेळा विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व केले.

2019 साली सुद्धा त्यांना निवडणूक लावण्याचा आग्रह समर्थ समर्थकांनी केला. पण 94 वर्ष असलेले वय तसेच शरीर साथ देत नसल्याने त्यांनी निवडणूक न लढवण्यावर ठाम राहत आपला निर्णय बदलला नाही. एकच शेतकरी कामगार पक्ष, एकच मतदारसंघ सांगोला विधानसभा मतदारसंघ आणि एकच उमेदवार गणपतराव देशमुख महाराष्ट्रात असं उदाहरण दुर्मिळच आहे. आजोबांपासून नातवाचेही मतदान गणपतराव यांना मिळाले होते. आयुष्यातील 50 वर्ष त्यांनी विधानसभेतील अनेक मुख्यमंत्री आणि मंत्री यांचे काम पाहिली होती. तसंच आपल्या कामाचा ठसा सुद्धा त्यांनी राज्यातील राजकारणात उमटवला होता. आज त्यांच्या जाण्यामुळे विधानसभेचा एक साक्षीदार निखळला अशी भावना व्यक्त होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.