साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सिडकोच्या अधीक्षक अभियंत्यांच्या सोबत घेतली बैठक
सिटी बेल | पनवेल |
सध्या महाराष्ट्रामध्ये महापुराने थैमान घातले आहे. दरड कोसळण्याच्या प्रकारामुळे आणि पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने शेकडो निष्पाप जीवांनी आपले प्राण गमावले आहेत. सगळीकडून मदतीचा ओघ सुरू असला तरी देखील याच पूरपरिस्थितीतून दरवर्षी वारंवार जाणाऱ्या नवीन पनवेलकरांसाठी मात्र प्रशासनाचे कागदी घोडे हलताना दिसत नाहीत.म्हणूनच नवीन पनवेल मध्ये उद्भवणाऱ्या पूरसदृश परिस्थितीला अटकाव घालण्यासाठी पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष संदीप भरत पाटील यांनी आक्रमक होत प्रभावी तोडगा काढण्यासाठी सिडकोचे अधीक्षक अभियंता यांचेसोबत बैठकीचे आयोजन केले होते.
नवीन पनवेल येथील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा अभ्युदय बँक ते ए टाईप रस्ता येथे दीड दोन तासाच्या पावसाने देखील चार ते पाच फूट पाणी साचते. तसेच सेक्टर 13, 14, 17 व 18 यांच्यामधील E- 1,PL 5,PL 6,C6,C5 या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना साचलेल्या पाण्यामुळे एका वेगळ्याच जाचाला सामोरे जावे लागत आहे. येथील सांडपाणी वाहून नेणार्या वाहिनी पूरसदृश परिस्थिती मध्ये सांडपाणी उलट्या दिशेने अर्थातच घरांमध्ये घेऊन येण्यास सुरुवात करतात. त्याचा परिणाम म्हणून पूरसदृश्य परिस्थिती मध्ये येथील रहिवाशांच्या घरात मल मिश्रित सांडपाणी शिरते. दुर्गंधी व रोगराई या सगळ्यांचा सामना नवीन पनवेल मधील येथील नागरिक गेले अनेक वर्षे करत आहेत.
या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी सिडकोचे अधीक्षक अभियंता यांच्यासोबत आज मंगळवार दिनांक 27 जुलै रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये पूरसदृश परिस्थितीत पाण्याचा निचरा कसा होईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना संदीप पाटील म्हणाले की,अभ्युदय बँक आणि कलिमाता मंदिर या ठिकाणी रत्यावर तसेच श्रेयस हॉस्पिटल चे मागे रेल्वे ट्रॅक पाशी अशा दोन ठिकाणी जमा झालेले पाणी होल्डिंग पाँडमध्ये सोडण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात येणार आहेत. त्यासाठी सिडको रेल्वे सोबत समन्वय साधेल.या दोन ठिकाणी पाणी होल्डींग क्षेत्रात गेल्यास पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल,असे केल्याने सांडपाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांवर ताण येणार नाही व सांडपाणी नागरिकांच्या घरात उलट्या प्रवाहने घुसणार नाही.
संदीप पाटील यांनी पुढाकार घेऊन पूरसदृश परिस्थिती ला अटकाव घालण्यासाठी जे प्रयत्न केले आहेत त्याबाबत समाधानी असल्याचे येथील अनेक रेसिडेन्शल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविले.








Be First to Comment