Press "Enter" to skip to content

गणपती उत्सवासाठी कोकणात २२०० बसेस सोडणार १६ जुलैपासून आरक्षण सुरु

परीवहन मंत्री ॲड.अनिल परब यांची माहिती

सिटी बेल | मुंबई |

कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २२०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर येथील प्रमुख बसस्थानकातून दि.४ सप्टेंबरपासून या बसेस सुटणार असून चाकरमान्यांना थेट घरापर्यंत सुखरूप सोडण्यात येणार आहे. तर १४ सप्टेंबरपासून या गाड्या परतीच्या मार्गाला लागणार आहेत. दि. १६ जुलै २०२१ पासून या बसेसचे परतीच्या प्रवासाचे आरक्षण सुरु होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी दिली.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. ‍किंबहुना एसटी, गणपती व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतुट नाते आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. गेल्यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने वाहतुकीवर निर्बंध घातले होते. मात्र, यंदा कोरोनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सवासाठी जादा गाड्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

त्यानुसार सुमारे २२०० जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील, असे मंत्री ॲड. अनिल परब यांनी सांगितले. गणेशोत्सवासाठी ४ सप्टेंबर ते १० सप्टेंबर २०२१ दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील. तर १४ सप्टेंबर ते २० सप्टेंबर दरम्यान या गाड्या कोकणातून परतीच्या प्रवासाला लागतील. या बसेससाठी १६ जुलै २०२१ पासून आरक्षणाला सुरुवात होणार असून चाकरमान्यांना परतीच्या प्रवासाचे देखील म्हणजेच एकाचवेळी आरक्षण करता येणार आहे. प्रवासापूर्वी सर्व बसेस निर्जंतुक केल्या जाणार असून प्रवासादरम्यान सर्व प्रवाशांना मास्क घालून प्रवास करणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.