सिटी बेल | खांब-रोहे | नंदकुमार मरवडे |
रोहे तालुक्यातील संभे गावचे सुपुत्र प्रतिष्ठित नागरिक व तालुका कुणबी समाजाचे जेष्ठ नेते व माजी उपाध्यक्ष तसेच स्नेह ज्येष्ठ नागरीक कल्याणकारी मंडळ कोलाडचे संस्थापक-अध्यक्ष आणि रा. जि. ज्येष्ठ नागरीक संघाच्या समन्वय समितीचे माजी सदस्य व उत्कृष्ट कबड्डीपट्टू दिनेश सानप तथा दगडूखोत यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.
अतिशय हुशार,प्रत्येक कामात हजरजबाबी, अडल्या नडलेल्यांना सर्वतोपरी सहकार्य करणारे,क्रुषीनिष्ठ शेतकरी, वारकरी सांप्रदायाचे निस्सिम भक्त,कुशल राजकारणी व समाजसेवक तसेच गावाच्या व समाजाच्या विकासाची तळमळ अंगी बाणणारा एक सच्चा दिलाचा कार्यकर्ता व नेता अशा अष्टपैलू गुणांची खाण असणारे दिनेश सानप उर्फ दगडूखोत यांचे महाविद्यालयीन शिक्षण जेएसएम काँलेजला झाले.तर काल प्रकल्प विभागात शासकीय सेवेतही ते होते.कुणबी समाजाचे नेते माजी आ.पां.रा.सानप यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी कार्य केले तर आ.पां.रा.सानप यांच्या पश्चात त्यांनी समाजाचे विकासासाठी त्यांनी आपली हयात घालविली.तर राजकीय क्षेत्रात कार्य करीत असताना तारुण्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत शेकापच्या लाल बावट्याशी एकनिष्ठ राहिले. राजकारणात अनेक स्थित्यतंरी घडली.परंतू ते जराही विचलित झाले नाहीत.
खा.बँ.ए.आर.अंतुले,खा.दत्ता पाटील,खा.दि.बा.पाटील,खा.रामशेठ ठाकूर, लोकनेते द.ग.तटकरे,लोकनेते प्रभाकर पाटील,आ.भाई सावंत, आ.अशोक साबळे,आ.मोहन पाटील, खा.सुनील तटकरे, खा.अनंत गीते, आ.जयंत पाटील, आ.अनिलभाऊ तटकरे, आ.धैर्यशील पाटील, आ.पंडीत पाटील, आ.मिनाक्षी पाटील,आ.तुकाराम सुर्वे आदी राजकारणातील विविध पक्षीय नेते मंडळींशी त्यांचे कौटुंबिक व जिव्हाळ्याचे संबंध होते.राजकारण करीत असताना केवल राजकारण न करता समाजकारणाला अधिक महत्त्व देऊन त्यांनी कार्य केले.वयाच्या शेवटच्या श्वासापर्यंत शरीर व मनानेही कणखर होते.एक उत्कृष्ट वक्ता,प्रत्येक कार्यात कुशल,हजरजबाबीपणा, कणखर नेतृत्व, उंच व सद्रुढ शरीरयष्टी, छाप पाडणारे व्यक्तिमत्त्व, कामात तत्परता आदी त्यांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये होती.संभे गावसह संपूर्ण तालुका व जिल्ह्यातील एक ना अनेक मातब्बरांचे ते सवंगडी होते.
जीवन-मरणाच्या संघर्षामध्ये गेली दहा वर्षे ते झगडत होते त्यांना हृदयविकाराचा त्रास होता ९० टक्के ब्लॉकेज होते परंतु दाट इच्छाशक्तीच्या जोरावर ते कुठल्याही प्रकारचा ऑपरेशन न करता दहा वर्ष व्यवस्थित रित्या जीवन जगले एक ना अनेक प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आले परंतु त्यांना न घाबरता आपलं जीवन जगले.
समाजनेते दिनेश सानप यांच्या निधनाने समाज एका धुरंदर व कणखर नेतृत्वास पारखा झाला असून समाजाला त्यांच्या कामाची सतत उणिव भासत राहणार
असल्याची भावना समाजमनातून व्यक्त होऊ लागली आहे.त्यांच्या पश्चात त्यांना एक मुलगा,मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी व अंतिम धार्मिकविधी वार दि.९ जुलै रोजी संभे येथील निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.








Be First to Comment