मनमानसी भाग-क्रमांक ७* *वसा खारुताईचा..*
नुकत्याच झालेल्या तौक्ते वादळात अनेक जुन्या वृक्षांची पडझड झाली, खुप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ते दृश्य बघून मन उदास झाले.अनेकवर्ष आपल्याला सावली देणाऱ्या त्या वृक्षांची अशी अवस्था म्हणजे आपल्या घरातील वडीलधारे गेल्यानंतर आधार जावून आपण पोरके होतो अगदी तसेच दु :ख झाले, कारण लहानपणी माझे या वृक्षांशी जूने ऋणानुबंध होते.
लहानपणी उन्हाळी सुट्टी सुरू होण्याआधीच मामा बैलगाडी घेऊन यायचा, मग आम्ही सगळे भावंडे मस्त बैलगाडीत बसून चांगले महिना, दोन महिने मामाच्या गावी जातं आणि शेतात दिवसभर हुंदडत..!
पहाटेच गायीच्या हंबरण्याने व पक्षांच्या किलबिलाटाने लवकर जाग यायची..! उन्हाळा असल्याने लवकरच तांबड फुटायचं, त्यावेळी दात घासायला कोलगेट वगैरे काही नसायचे.. मस्त कडुलिंबाच्या सालीने दात घासायचे, नाहीतर बिटको दंतमंजन हातावर घेवून बोटाने खराखरा दात घासले कि, मस्त गायीच्या दुधाची धारोष्ण दुध प्यायचे..आणि शेतात जाण्यासाठी मामांबरोबर भाकरी, ठेचा घेऊन पायीच वारी सुरू व्हायची..! सोबत कपड्यांची पिशवी घेवून, रस्त्याने चालतांना पण वेगवेगळ्या झाडांवरील फुलपाखरांशी खेळत, फळं, कामुका खात खातचं , शेत कधी यायचे ते पण समजायचे नाही..!
मामा शेताच्या कामावर निघून गेला कि, मग आम्ही फिरायला मोकळे..बोरं , जांभूळ, चिंचा पाडायला दगडं मारुन कोण जास्त बोरं पाडेल, अशी चढाओढ चालत..! मग मध्येच खारुताई चपळाईने तुरुतुरु या झाडावरून त्या झाडावर चढत , माझं बऱ्याचदा लक्ष त्या खारुताई च्या हालचालीवर असायचं..पण मध्येच मामा आवाज द्यायचा..बस रे आता.. मोट सुरू करतो, आंघोळी करुन घ्या..! गच्च पाणी भरलेल्या हौदात उडी मारून , पाणी उडवतचं, मनसोक्त पोहायचे कि झाली आंघोळ..! मध्येच गांडूळ पायावर यायचे,तर कधी गुदगुल्या झाल्या कि, समजायचे पायावर गोगलगाय चढली, घाबरून पाय आपटतचं पळायचे आणि खारुताई तर मस्त भुईमुगाची शेंग घेवून इतकी चपळाईने जायची आणि जमिनीत खड्डा करून , लक्षात राहीलं ना, अशा पद्धतीने काहीतरी विचार करायची आणि इवल्याशा पावलांनी माती बाजूला करतच,अनेक बिया, शेंगा जमिनीत लपवून ठेवायची झुपकेदार शेपटी हलवून पुन्हा भराभर झाडाच्या खोडावरुन चढत जात.. हे बघून खूप गंमत आणि कुतूहल पण वाटायचं..मग न राहवून शेवटी मी कुतुहलाने मामाला खारुताईविषयी विचारलेच..तर मामाने सांगितले कि, ही छोटीशी खारुताई शेंगा खाण्यासाठी जागा शोधते, हा तिचा रोजचा दिनक्रम बरं..आणि आरामात खाता यावे म्हणून जमिनीत लपवून ठेवते…आणि मग भूक लागली कि होते ना तिची फजिती..! कारण शेंगा कोणत्या ठिकाणी लपवून ठेवल्या..हेच ती विसरून जाते, आणि मग पुन्हा बिया घेते जमेल तसे खाते आणि जमिनीत लपवून ठेवते..असं वाटतं की, खारुताई आपल्याला वृक्षारोपण करा..झाडे लावा,पर्यावरण सांभाळा असा संदेश देत आहे. मग पावसाळा सुरू होण्यापूर्वी आपणही खारीचा वाटा घेवून शक्य तेथे बिया रुजवल्या तर वनराई वाढून सृष्टी सुजलाम् सुफलाम् होईल. आताच वाचण्यात आले कि, आपल्या पनवेलमध्ये मोरबेकर जोशी वाड्यात ७५ वर्षांचे औदूंबराचे वृक्ष तौक्ते वादळामुळे उन्मळुन पडले , पण वेळीच सगळ्यांनी त्याला मायेने उठवलं, पुन्हा उभं केलं.हे वाचून डोळ्यात पाणी तरळलं.
नंतर काही वेळातच खारुताईने घेतलेला वसा पण आठवला.आणि शुभस्य शीघ्रम म्हणून व पर्यावरण दिनाच औचित्य साधल व शक्य तेवढ्या ठिकाणी बिया व रोपांचे वृक्षारोपण केले..आणि त्या वृक्षांचे संवर्धन करण्याचे पण ठरवले. खुप समाधान वाटलं, नुकत्याच झालेल्या वादळात अनेक झाडांची पडझड झाली होतीच, मग निसर्गाप्रती आपलही देण लागतचं ना..! झाडे लावणे व त्याला जीवापाड जपणे हे आपले कर्तव्य आहे.त्यामुळे प्रदुषण कमी होवून प्राणवायू मोठ्या प्रमाणात मिळेल..! सध्या त्याची नितांत आवश्यकता आहे, बरोबर ना?
सौ. मानसी जोशी.,
खांदा कॉलनी.
Be First to Comment