दिलखुलास, सदा हसतमुख राहणारे नेतृत्व हरपल्याने कार्यकर्त्यांवर शोककळा
शेतकरी कामगार पक्षाच्या जडणघडणीमध्ये मोलाचे योगदान देणारे निष्ठावंत कार्यकर्ते चंदर शेठ घरत यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मस्तिष्क पेशींच्या व्याधीमुळे त्यांना तुर्भे येथील रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. शुक्रवार दिनांक 9 एप्रिल रोजी अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.शनिवार दिनांक १० एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता त्यांच्या पार्थिवावर पनवेल च्या अमरधाम स्मशानभूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.
चंदर शेठ यांचे पूर्ण नाव रामचंद्र जयराम घरत असे होय,ते मूळचे जासई इथले.पनवेल मधील गुरुशरणंम् सोसायटी मध्ये ते वास्तव्यास होते. शेतकरी कामगार पक्षातील ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांपासून ते अगदी तळागळातील कार्यकर्ता त्यांना आपुलकीने चंदर शेठ अशी हाक मारायचे.दिलखुलास स्वभाव,हसतमुख व्यक्तिमत्व आणि त्याला मिश्किल पणाची जोड असणाऱ्या चंदर शेठ यांचा पक्षात आणि समाजात मोठा चाहता वर्ग होता.
त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी, सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे.शेकाप चे ज्येष्ठ नेते माजी आमदार विवेक पाटील यांचे ते व्याही होते.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी सलग दोन टर्म काम यशस्वी पणें केले होते.शेकाप च्या बांधणी मध्ये माजी आमदार दत्तू शेठ पाटील,माजी आमदार विवेक पाटील,माजी खासदार रामशेठ ठाकूर,जे एम म्हात्रे यांच्या खांद्याला खांदा लावून पनवेल-उरण – खालापूर तालुक्यांमध्ये शेका पक्ष वाढवण्यासाठी चंदर शेठ घरत यांनी अविश्रांत परिश्रम घेतले होते. पुढे शेतकरी कामगार पक्षाला संघर्षमय कालखंडातून वाटचाल करावी लागली, अनेक दिग्गज हातामध्ये निरनिराळ्या पक्षांचे झेंडे घेउ लागले. चंदर शेठ यांची घनिष्ट मैत्री असलेले नेते सुद्धा शेका पक्षापासून फारकत घेत होते. परंतु वैयक्तिक मैत्री किंवा व्यावसायिक हितसंबंध याहीपेक्षा चंदरशेठ यांनी मात्र कायम पक्षनिष्ठा या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व दिले. त्यामुळेच अखेरच्या श्वासापर्यंत शेतकरी कामगार पक्षाचा लाल झेंड्याशी एकनिष्ठ असणाऱ्या चंदरशेठ घरत यांच्या दुःखद निधनाने तमाम कार्यकर्त्यांच्या मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.







Be First to Comment