सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।
कोरानाचे संकट अजूनही पुर्णपणे संपले नाही. त्यामुळे यावर्षी 19 फेब्रुवारीला होणारी ‘छत्रपती शिवाजी महाराज जयंती साधेपणाने साजरी करण्याच्या सुचना राज्य शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. यालाच अनुसरून पनवेल महानगरपालिकेने शहरातील शिवजयंती मंडळानी यावर्षीचा शिवजयंतीचा उत्सव साधेपणाने साजरा करावा असे आवाहन केले आहे.
कोरानाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी कोणत्याही प्रकारच्या बाईक रॅली, प्रभात फेरी, मिरवणुका काढण्यात येऊ नये, तसेच कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे व्याख्यान,गाणे नाटक, असे सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास मनाई करण्यात आली आहे.
शिवप्रेमीनी शिवजयंती दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला किंवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करून त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींग पालन करून फक्त दहा व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक शिबीरे ,उपक्रम आयोजित करण्यास शिवजयंती मंडळांनी प्राधन्य द्यावे. यावेळी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम जसे की मास्क, सॅनिटायझर वापरावे. असे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले आहे.
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने मा. महापौर डॉ.कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शिवजयंती उत्सव समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी महापौरांनी देखील शासनाच्या नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करण्याचे आवाहन केले. याच पध्दतीने माघी गणेश उत्सव देखील साध्या पध्दतीने साजरा करावा असे आवाहन प्रशासनाच्यावतीने शहरातील गणेश मंडळांना करण्यात आले आहे.
या बैठकीस शहर पोलिस निरीक्षक लांडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष संतोष शेट्टी, महिला बालकल्याण सभापती मोनिका महानवर,प्रभाग समिती ‘क सभापती हेमलता म्हात्रे, उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त चंद्रशेखर खामकर, शिवजयंती उत्सव समितीचे सदस्य, शहरातील विविध संघटनाचे अध्यक्ष तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment