Press "Enter" to skip to content

खोपटे गावावर काळ आला होता पण….


रात्री साडेअकराच्या सुमारास झाली हजरडस्ट केमिकलची गळती :
न्यु ट्रान्स इंडिया प्रकल्पातील भयानक प्रकार ग्रामस्थानी अनुभवला


सिटी बेल लाइव्ह । न्हावा शेवा । अजित पाटील ।

उरणच्या खोपटे गावकऱ्यांवर बुधवारची रात्र काळ रात्र होऊनच आली होती मात्र जागरूक नागरिकांनी आणि ग्रामपंचायत सदस्य व सरपंचांनी रात्रीच्या अंधारात आजूबाजूच्या सर्व कंटेनर यार्ड मध्ये रात्रीच धाडी घालून न्यु ट्रान्स इंडीया नामक गोदामात एका कंटेनर मधून होत असलेली ही विषारी केमिकल गळती अनुभवली आणि प्रशासनाला ताळ्यावर आणून ती गळती थांबवायला लावली . ग्रामस्थानी दाखविलेल्या या तत्परतेमुळे पुढचा अनर्थ टळला आहे मात्र गोदामांचे प्रशासन किती निगरगट्ट आणि बेपर्वाईने वागत आहे याचा अनुभव या निमित्ताने खोपटे गावकऱ्यांना अनुभवायला मिळाला आहे.

उरणच्या पुर्व भागात सध्या कंटेनर यार्डचे पीक आले आहे . पुर्वी भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या या भागात सध्या मोठ्या प्रमाणात कंटेनर यार्डचे जाळे निर्माण झाले आहे. असे कंटेनर यार्ड वासवितांना महसूल खात्याचे अनेक नियम पायदळी तुडविले जात आहेत.

नैसर्गिक पाणी निचरा नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे ही केली जात आहेत. तिवरांच्या झाडांचा जीव घेतला जात आहे मात्र महसूल विभागाच्या अधिकारी वर्गाचा सातत्याने गांधारी झाल्याचा अनुभव स्थानिक घेत आहेत. काल बुधवारची रात्र तर गावकऱ्यांसाठी अगदी यम बनूनच आली होती. रात्री साडेअकरा ते बाराच्या दरम्यान गावातील अनेक नागरिकांना मळमळणे , उलट्या होणे असे त्रास जाणवू लागले तर वातावरणात घरगुती गॅस सिलेंडर लिकेज झाल्यावर जसा उग्र घाण वास येतो तसा वासही मोठ्या प्रमाणात पसरला होता.

गावात काही हळदी आणि लग्न समारंभ होते तिथेही हा वास येत असल्याचे नागरिकांना जाणवले . त्यातूनच काही ग्रामस्थ , ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, आणि युवक कार्यकर्ते यांच्या सह सरपंचाचे पती श्री प्रशांत रमेश ठाकूर यांनी परिसरात असलेल्या कंटेनर यार्ड परिसरात पाहणी सुरू केली असता त्यांना ट्रान्स इंडिया प्रकल्पात एका केमिकल कंटेनर मधून हजरडस्ट नामक केमिकलची गळती होत असल्याचे आढळून आले . त्यामुळे ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य आदींनी कंपनी प्रशासनाला धारेवर धरत ही गळती त्वरित थांबविण्यास भाग पाडले .

त्यातूनच मग युद्ध पातळीवर प्रयत्न करून ही गळती थांबविण्यात आली त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. ज्या कंटेनर यार्डमध्ये ही केमिकल गळती झाली त्याचे मुख्य अधिकारी श्री. राहुल आचरेकर यांच्याशी या बाबत संपर्क साधला असता त्यांनी युनायटेड फॉस्फरस कंपनी नावाच्या कंपनीचा हा कंटेनर असून त्यात गळती झाली होती त्यांच्या टीमला आम्ही बोलावून कंटेनरची गळती थांबविण्यात आली असल्याची माहिती बोलतांना दिली आहे.

न्यु ट्रान्स इंडिया प्रकल्पाला हजरडस्ट केमिकल चे कंटेनर्स प्रकल्पात ठेवण्याची परवानगी आहे का याबाबत विचारले असता त्यांनी आपण उद्या कंपनीत या आपणास सर्व कागदपत्रे दाखवतो अशी माहिती दिली . या सर्व प्रकाराबाबत ग्रामपंचायत सरपंच सौ. विशाखा ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अत्यंत सन्तप्त प्रतिक्रिया देताना या भागातल्या कंपन्या आमचा हक्काचा कर वेळवर देत नाहीत , ग्रामस्थानच्या सुरक्षेत्साठी कोणतेही प्रयत्न करत नाहीत आणि अशा प्रकारे अपघात झाल्यावर प्रकल्पात कोणताही अधिकारी सुद्धा उपस्थित नव्हता ही शोकांतिका आहे ! तालुक्याचे प्रशासन अशा प्रकारच्या केमिकल गळती होऊन 5 – 10 लोकं मेल्यावरच यातून काही शिकतील का असा सवाल सरपंचांनी विचारला आहे!!

एकूणच येथील कंपनी अधिकाऱ्यांची बेफिकिरी या निमित्ताने समोर आली आहे.त्याचबरोबर हजरडस्ट सारखे केमिकल या ठिकाणी हाताळले जात असताना उचच अधिकारी कोणीही प्रकल्पात नव्हता त्यामुळे यांच्यावर शासनाने कडक कारवाई केली पाहिजे असेही सरपंचांनी बोलतांना सांगितले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.