सिटी बेल लाइव्ह । कर्जत । संजय गायकवाड ।
कर्जत तालुक्यातील नगरपरिषद हद्दीला लागून असलेल्या लाखरन गावातील एका शेतकऱ्याने रताळ्याचे अमाप पीक घेतले असून एका रताळ्याचे वजन तब्बल साडेतीन किलो आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक घेण्याबरोबरच अन्य पीक घेण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे हे या प्रयोगावरून सिद्ध झाले आहे.
लाखरन येथील प्रगतशील शेतकरी सूर्यकांत किसन भासे हे आपल्या शेतीवर विविध प्रयोग करीत असतात. यापूर्वी त्यांनी केळी, हळद, आले, भुईमूग आदी अपारंपारिक पिके घेऊन शेतकऱ्यांसाठी वेगळी दिशा दिली होती. ही पिके आपल्याकडे होत नाहीत हे जुन्या शेतकऱ्यांचे म्हणणे खोडून काढले होते व विक्रमी पिके काढून दाखविली होती.
यावेळी त्यांनी रताळ्याचे विक्रमी पीक काढले असून एक ते साडेतीन किलो पर्यंत एकेका रताळ्याचे वजन आहे. त्यांना ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, श्रद्धा फाउंडेशन आशा अनेक संस्थांकडून प्रगतशील शेतकरी म्हणून अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
पुणे येथील एस. बी. ऍग्रोटेक कंपनीचे अगरवाल व जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती पुंडलिक पाटील यांनी भाजीपाला व फळांच्या अपारंपारिक पिकांवर लक्ष केंद्रित करणारा एक शेतकऱ्यांचा समूह तयार करीत असून गेली तीन वर्षे ते याबाबत सतत प्रयत्नशील आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना लागणारे अद्ययावत बियाणे, खते विशेषतः सिलिकॉन तसेच लागवडीबाबत इतरही मार्गदर्शन व प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे काम कोणतीही अपेक्षा न ठेवता करीत असतात.
‘मी नेहमी वेगवेगळे शेतीचे प्रयोग करून जास्तीत जास्त उत्पादन कसे निघेल याकडे लक्ष देतो. रताळ्याचे पीक घेताना मल्चिंग पेपर व सिलिकॉन खताचा खूप फायदा झाला.’
सूर्यकांत भासे, प्रगतशील शेतकरी
‘शेतकरी वर्गाला शेतीचे चांगले उत्पन्न मिळावे यासाठी शेतकऱ्यांचा समूह तयार करण्यामागे एका शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर अन्य शेतकऱ्यांना त्याचा फायदा व्हावा हाच प्रामाणिक हेतू आहे.’
पुंडलिक पाटील, माजी बांधकाम सभापती, राजिप.








Be First to Comment