Press "Enter" to skip to content

दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची नावडे येथे बैठक संपन्न

महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार : बबनदादा पाटील 🔶🔶🔷🔷

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । वार्ताहर । 🔷🔶🔷🔶

आताचे ठाकरे सरकार, तथा महाविकस आघाडीचे सरकार हे प्रथम शेतकऱ्यांच्या हिताचे सरकार आहे. म्हणून शेतकरी प्रकल्पग्रस्तांनी आस लावून आशेने बघितलेले स्वप्न उध्दव ठाकरे हे पूर्ण करून दाखवणार असल्याचा विश्वास लोकनेते दि.बा.पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

बबनदादा पुढे म्हणाले की, ज्या दिवशी मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे खुर्चीवर बसले आणि तिसऱ्याच दिवसापासून विमानतळ बाधित प्रकल्पग्रस्तांसाठी प्रकल्पग्रस्तांसाठी हिताचे निर्णय घेण्याचा त्यांनी पण केला आणि आता ते प्रत्यक्षात उतरत आहेत. कोविडमध्ये महा विकास आघाडीच्या वतीने पनवेल आणि उरण साठी रुग्णालये मागितली. त्यानुसार उरणमध्ये कोविडसाठी रुग्णालय दिले तर पनवेलमधील समाजमंदिर येथे तात्पुरत्या स्वरूपात २०० खाटांची व्यवस्था करण्यात आली तर कोविडसाठी अत्याधुनिक रुग्णालयाची व्यवस्था सुरूच आहे.

स्थानिक शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यात यावीत यासाठी पनवेल उरण महाविकास आघाडीच्या दिवंगत दि.बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीची बैठक नावडे येथे पार पडली.

यावेळी पनवेल उरण महाविकास आघाडीच्यावतीने दिवंगत दि.बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा शिवसेनेचे ज्येष्ठ सल्लागार बबनदादा पाटील, समितीचे उपाध्यक्ष तथा कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटील,पनवेल महानगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक सतीश पाटील, समितीचे कार्याध्यक्ष प्रशांत पाटील, सल्लागार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत,शेकाप पनवेल विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष काशिनाथ पाटील, समितीचे सचिव सुदाम पाटील,शेकाप पनवेल महानगरपालिका जिल्हा चिटणीस गणेश कडू, खजिनदार तथा शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष शिरीष घरत, नगरसेवक अरविंद म्हात्रे आदींसह पदाधिकारी आणि सदस्य तसेच शेतकरी, प्रकल्पग्रस्त उपस्थित राहिले होते.

यावेळी उपस्थित प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना यापूर्वीपासून ज्या अडचणी भेडसावत आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यामध्ये इरफान पटेल यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडल्या. यावेळी समितीच्या वतीने त्यांना न्याय मिळवून देण्याचा विश्वास संपादित केला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा समितीचे सल्लागार आर.सी.घरत यांनी बोलताना सांगितले की, गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यासाठीचा प्रश्न हा गेली कित्येक वर्षे प्रलंबित आहेत. त्यातच स्वतः च्या मालकीची घरे सिडको कडून तोडण्याचा घाट घातला जात होता. मात्र महा विकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढणे व ते शेवटच्या श्वासापर्यंत पूर्णत्वास नेणे हा एकच विश्वास मनात बाळगून पनवेल उरण महा विकास आघाडीच्या दिवंगत दी.बा.पाटील स्थानिक शेतकरी प्रकल्पग्रस्त समितीची स्थापना करण्यात आली. समितीमार्फत जो काही पाठपुरावा करण्यात आला आहे, त्यात आता प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या सहकार्याची गरज आहे. समितीमार्फत करण्यात आलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाने ठाणे आणि रायगड जिल्हाधिकारी यांना सर्व्हे करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये असे सगळ्यांना वाटत असेल तर सर्व्हे करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे. तरच आपण आपली गरजेपोटी बांधलेली घरे कायम करण्यासाठी आपण यशस्वी होऊ, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी बोलताना आमदार बाळाराम पाटील म्हणाले की, महा विकास आघाडीच्या माध्यमातून समितीने जी पावले उचलली आहेत, ती यशस्वी मार्गक्रमण करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांनी बांधलेलं कोणतेही असो, ते गरजेपोटी आहे याची गंभीर दखल राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली, आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रकल्पग्रस्तांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येवू नये, हे काम महा विकास आघाडीच्या वतीने प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने केले आहे. आपली घरे ही नियमित होणार ही काळया दगडावरची रेघ आहे. आणि त्यातूनही जर कोणी घरे तोडण्यासाठी आला तर मात्र स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने त्यांना जागेवरच उत्तर दिले जाईल, ज्या पद्धतीने अधिकाऱ्यांचा हट्ट असेल त्या पद्धतीने त्या अधिकाऱ्यांचा हट्ट आडवा पाडण्याची हिम्मत आमच्या पदाधिकाऱ्यांची आहे. सिडकोला आज ५० वर्षे झाली असली तरी प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी ह्या १०० वर्षांहून अधिक वर्षांच्या आहेत, हे सिडकोने लक्षात ठेवले पाहिजे, अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांसाठी पुन्हा मोठा संघर्ष करावा लागेल, याची नोंद या अधिकाऱ्यांनी घ्यावी असेही आमदार बाळाराम पाटील यांनी सांगून उपस्थितांना आश्र्वासित केले.

यावेळी समितीचे सचिव सुदाम पाटील यांनी उपस्थितांना माहिती देताना सांगितले की, आज आपल्यासाठी सर्वच महा विकास आघाडीचे नेते ओरडुन ओरडुन आपल्या हिताचे सांगत आहेत. आता तुम्हालाच ठरवायचे आहे, आपले चांगले करायचं आहे की वाईट. पूर्वी सांगितले जायचे की, संगत वाईट असते, म्हणून सांगतो तुम्हाला कोणीही काहीही सांगत असेल तर लक्ष देवू नका, कारण आपल्या हितासाठी महा विकास आघाडीचे नेते दिवस रात्र काम करीत आहेत. त्यामुळे आपल्याकडे सर्व्हेसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना सहकार्य करा आणि महा विकास आघाडीवर विश्वास ठेवा, समिती आपल्याला नक्कीच न्याय देवून एक गोड बातमी समोर ठेवेन.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.