वडिलांच्या मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी उरकले सर्व विधी : अंगणात खड्यात अस्थी ठेऊन लावले बकुळीचे झाड 🔷🔶🔶🔷
वृद्धाश्रम व अनाथाश्रमाला केली आर्थिक मदत 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह । नागोठणे । महेश पवार । 🔶🔶🔷🔷

अंधश्रद्धा निर्मूलन समिती रायगड शाखेचे अध्यक्ष व रायगड जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष नागोठण्यातील नागरिक विवेक सुभेकर यांच्या वडिलांचे निधन काही दिवसांपूर्वी झाले. त्यानंतर पारंपारिक कर्मकांडांना फाटा देत वडिलांचे मरणोत्तर सर्व विधी तिसऱ्या दिवशी उरकले. याबरोबरच अस्थी विसर्जन देखील अंगणात खड्यात करून त्यावर बकुळीचे झाड लावून केले. आणि बाराव्या व तेराव्याचा खर्च वृद्धाश्रम व अनाथाश्रमाला मदत करून केला.
विवेक सुभेकर यांचे वडील रघुनाथ सुभेकर हे निवृत्त शिक्षक होते. मरणोत्तर आपले सर्व विधी तिसऱ्या दिवशी पुर्ण करावेत व बारावे तेरावे याचा खर्च वृध्दाश्रम व अनाथाश्रम या ठिकाणी वस्तू रुपाने दयावा हे आधीच त्यांनी कुटूंबीयांना सांगितले होते. याप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्यांचे सगळे विधी पुर्ण केले. आणि कुटुंबियांनी मागील आठवड्यात घराच्या अंगणासमोर खड्डा करुन त्यामध्ये अस्थींचे विसर्जन व त्यावर बकुळाचे झाड लावून वडीलांची चिरंतन आठवण जतन करून ठेवली. अशा प्रकारे सुभेकर कुटुंबीयांनी विवेकी पाऊल उचलत नवा आदर्श निर्माण केला आहे. अण्णांनी दिलेले संस्कार आम्हा सर्व कुटूंबियांना अनमोल आहेत अशी भावना सुभेकर कुटुंबीयांनी यावेळी व्यक्त केली.
यासंदर्भात विवेक सुभेकर यांनी सांगितले की, आमचे वडील अण्णा हे यापुढेही आमच्या सोबत असतील ही जाणीवच मनाला आनंद देवून जाते. बकुळीची फुले ही खुप सुगंधी असून त्याची फळेही खुप छान लागतात. हे झाड साधारण चारशे वर्षापेक्षाही जास्त जगते त्यामुळे या झाडाच्या माध्यमातून आमच्यावर अण्णांचे प्रेम व आर्शिवाद कायम राहतील. शिवाय पर्यावरण संवर्धन देखील झाले.








Be First to Comment