वसंतराव डावखरे स्मृत्यर्थ पुढील वर्षापासून कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप 🔷🔷🔷
सिटी बेल लाइव्ह । अलिबाग । विठ्ठल ममताबादे । 🔶🔶🔶
विधान परिषदेचे माजी उपसभापती दिवंगत वसंतराव डावखरे यांच्या स्मृत्यर्थ पुढील वर्षापासून कोकणातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देण्यात येईल, अशी घोषणा आमदार व भाजपाचे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी आज येथे केली.
आमदार निरंजन डावखरे व भारतीय जनता पार्टीच्या शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने वसंतस्मृती आदर्श शिक्षक व आदर्श संस्थाचालक पुरस्कार आज प्रदान करण्यात आले. ठाण्यातील मो. ह. विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात श्री. डावखरे बोलत होते.

या वेळी आमदार संजय केळकर, महापालिकेतील गटनेते संजय वाघुले, माजी महापौर अशोक राऊळ, नारायण पवार, मनोहर डुंबरे, भरत चव्हाण, शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस, भाजपा महिला आघाडीच्या ठाणे अध्यक्षा व नगरसेविका मृणाल पेंडसे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सारंग मेढेकर आदींची उपस्थिती होती.
वसंतराव डावखरे स्मृती पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष आहे. सध्या शिक्षक व आदर्श शिक्षकांना पुरस्कार दिले जात आहेत. या पुरस्काराची व्याप्ती आणखी वाढविण्यात येईल, असे नमूद करीत आमदार निरंजन डावखरे म्हणाले, “माझे वडिल वसंतराव डावखरे यांनीही प्रतिकूल परिस्थिती असताना घरोघरी पेपर वाटून शिक्षण पूर्ण केले होते. अशा पद्धतीने कोकणातही अनेक गुणवंत विद्यार्थी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील वर्षापासून गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाईल.” कोकणातील शहरी व ग्रामीण भागातील अनेक शिक्षकांकडून गुणवंत विद्यार्थी घडविले गेले आहेत. या पुरस्कार सोहळ्याच्या माध्यमातून अशा शिक्षकांचे कौतूक करण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे निरंजन डावखरे यांनी सांगितले.
माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या नावाने सुरू झालेला हा पुरस्कार शिक्षकांना अभिमानास्पद आहे. कोरोनाच्या आपत्तीतून शिक्षण क्षेत्रावरही संकट आले आहे. त्याला शिक्षक समर्थपणे सामोरे जात आहेत, याबद्दल आमदार संजय केळकर यांनी कौतूक केले.
या कार्यक्रमात आदर्श संस्थाचालक म्हणून जीवनदीप शैक्षणिक संस्ठेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे, नवी मुंबईतील आदर्श शैक्षणिक समुहाचे चेअरमन धनराज विसपुते, जनरल एज्युकेशन सोसायटीचे संचालक राजेंद्र राजपुत यांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर पालघर ते सिंधुदुर्गपर्यतच्या ३७ शिक्षकांना आदर्श शिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक विकास पाटील, एन. एम. भामरे, किशोर पाटील, विनोद भानुशाली आदींनी नियोजन केले होते.








Be First to Comment