Press "Enter" to skip to content

विमानतळाला ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके’ यांचे नाव द्या!

  • ‘फडके’ यांचा समावेश राज्य सरकारने राष्ट्रपुरुषांच्या यादीत करावा – आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सिटी बेल लाइव्ह । पनवेल । प्रतिनिधी ।

नवी मुंबई येथील विमानतळाला ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव द्यावे तसेच वासुदेव बळवंत फडके यांचा समावेश राष्ट्रपुरूष, थोर व्यक्‍तींच्या यादीत करून त्यांची जयंती राज्य सरकारतर्फे शासकीय पद्धतीने साजरी करावी, अशी मागणी आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके संघर्ष समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. तशा आशयाचे पत्र समितीचे अध्यक्ष योगेश मुकादम यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहे.

1857 चा उठाव अयशस्वी झाल्यानंतर संपूर्ण देश शांत झाला होता. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांनी देशामध्ये सर्वप्रथम सशस्त्र बंड उभारुन ब्रिटीश साम्राज्यासमोर आव्हान उभे केले. भारतभूमीला इंग्रजांच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपले जीवन मातृभूमीला अर्पण केले. त्यामुळे नवी मुंबई येथील विमानतळाला ‘आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असेे नाव देऊन सरकारने वासुदेव बळवंत फडके यांच्या हौतात्म्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळून 73 वर्षे झाली. तरी आजपर्यंत शासन दरबारी राष्ट्रपुरूषांच्या यादीमध्ये वासुदेव बळवंत फडके यांची नोंद केलेली नाही. याबाबत खंत व्यक्‍त करून राष्ट्रपुरूष, थोर व्यक्तींच्या यादीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा समावेश करून फडके त्यांची जयंती (4 नोव्हेंबर) शासकीय पद्धतीने साजरी करावी. अशी मागणी देखील या पत्राद्वारे करण्यात आली आहे.

देशाचे सर्वोच्च सभागृह असलेल्या दिल्‍लीतील संसदेमध्ये या महान विराचे तैलचित्र लावण्यात आले. तर दुसरीकडे त्यांची महाराष्ट्रातच उपेक्षा होणे, ही दुर्दैवाची बाब असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या महिन्यामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचे पुण्यस्मरण दिन येत असल्याने या मागण्यांसदर्भात तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.