सिटी बेल लाइव्ह गणेशोत्सव 2020 / मुरुड 🔷🔶🔷🔶
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गणपतीच्या आराशीतून समाज प्रबोधनाची परंपरा शिवाजीनगर कोळीवाडा ,मुरुड येथील मकू कुटुंबियांनी अखंड सुरु ठेवली आहे.
आर्थिक, प्रशासकीय आणि शैक्षणिक वर्ष अशी वर्षाची विभागणी केली जाते, मात्र कोळी बांधवांसाठी ‘मच्छिमारी वर्षं’ असावे ,अशी अतिशय योग्य संकल्पना जितेंद्र मकू यांनी मांडली आहे.
बारा महिन्यांचे वर्ष असताना, कोळी बांधवांना मात्र जून ते ऑगस्ट असे तीन महिने समुद्रात मासेमारी करण्यास कायद्याने बंदी घातली जाते. या दरम्यान काम नाही, तर खाणार काय ,असा समर्पक प्रश्न यातून समोर आला आहे.
त्याचबरोबर, अनुसूचित जमातीच्या संवर्गातून पंचवीस तीस वर्षांहून अधिक काळ नोकरी करणाऱ्या कोळी बांधवांच्या जातीत सरकारला एवढ्या कालावधीनंतर आता त्रुटी दिसावी , हे अनाकलनीय आहे.
जात तर व्यवसायावरुनच ठरते. मग दहाहून अधिक पिढ्या हा समाज मासेमारीचा व्यवसाय करीत असेल, तर आम्ही कोळीच आहोत, हे गणरायाच्या साक्षीने सरकारला सांगण्याचा उत्तम प्रयत्न या देखाव्यातून झाला आहे. या माध्यमातूनतरी शासनाचे लक्ष वेधून, कष्टकरी मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांच्या मुलांच्या नोकऱ्या शाबूत राहण्याचे साकडे घालण्यात आले आहे.
जितेंद्र मकू यांच्या मूळ संकल्पना आणि दिग्दर्शनातून साकारलेल्या लक्षवेधी देखाव्यासाठी मूर्तीकार संदीप दामोदर मोकल खार आंबोली ,व्हिडिओ एडिटिंग योगेश पाटील ;पार्श्व संगीत विजय शेडगे, निवेदन स्वप्निल चोगले, शब्दांकन महेश कवळे ;रेखाटन महेंद्र पाटील, उल्हास मकू तर सजावट सहभाग भाविका, वेद, दक्ष, विहान, सुयोग, साईश, रुपेश्री,रुचिला, रिद्धी, ऋणी, विधी , वंश, आर्वी, शितल, दिव्यांग यांचा आहे.
बाप्पाच्या साक्षीने रायगड जिल्ह्यातील कोळी समाजाची शासनापुढे बाजू मांडणाऱ्या या गणेशाचे दर्शन घेण्यासाठी ,शिक्षक,महाविद्यालयीन विद्यार्थी, वकील,डाॅक्टर,पत्रकार असे समाजातील विविध स्तरातील भाविक आवर्जून भेट देताना दिसून येत आहेत.
यासाठी सध्याच्या करोना पार्श्वभूमीवर घरातील दृष्यचित्रण प्रोजेक्टरवर पाहण्याची सुंदर व्यवस्था, सॅनिटायझरचा वापर, मास्कचे बंधन आणि योग्य सामाजिक अंतर ठेवताना दिसून येत आहे.


Be First to Comment