Press "Enter" to skip to content

परंपरेचा ठेवा खोपटे गावाचा शिवगौरा

सिटी बेल लाइव्ह गणेशोत्सव 2020

सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर / उरण 🌟💠🌟💠

उरण तालुक्यातील खोपटे पाटीलपाडा येथील शिवगौरा सोहळ्यात आतापर्यंत काशीखंड,रामायण,महाभारत,
पांडवप्रताप,शिवलीलामृत ,गणेश पूराण या पौराणिक ग्रंथाच्या आधारे एखाद्या आख्यायिकाची निवड करून त्याच्यावर आधारित चित्र देखावे तयार करून कथा सादर करण्याची परंपरा या गावात आज ही कायम आहे .

यामध्ये काहीसा बदल म्हणून मध्यंतरीच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेचा देखावा,रोहिडेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ असे देखावे उभारण्यात आले होते .आज ही खोपटे पाटील पाडा गावातील ग्रामस्थांनी आणि युवकांनी आपल्या पूर्वजांनी सुरू केलेली शिव गौरा पूजनाची व शक्ती-तुरा नांचाची परंपरा अखंडीत पणे सुरू ठेवली आहें .

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन होते,घराघरातून गणरायाचे स्वागत होत-असताना आपल्या लाडक्या लेकाचे पृथ्वीतळावर मोठ्या जल्लोषात होणाऱ्या स्वागतामध्ये गुंग झालेल्या आपल्या लाडक्या बाळाला परत नेण्यासाठी गौराईमाता भाद्रपद शुद्धसप्तमीस न विसरता येते,या गौराई मातेच्या स्वागताला आपण सारे सज्ज असतोच परंतु शिवपुराणात गौरी-गणपतीचे आगमन इतकेच संदर्भ नाही तर गौरी -गणपतीच्या आगमनाचा सोहळा पाहण्यासाठी स्वतः शिव-शंकर भाद्रपद शुद्ध अष्टमीला पृथ्वीवर येतात अशी अख्यायीका आहे ,म्हणूनच महाराष्ट्रात काही ठिकाणी भगवान शंकराची गौरापुजा करण्याची प्रथा आहे .

गेली ७९ वर्षे खोपटे पाटील पाडा येथे शिवकृपा गौरा मंडळाच्या वतीने ही गौरापुजनाची प्रथा अखंडपणे चालू आहे ,उरण पूर्व विभागातील खोपटेगाव हा त्या काळी अत्यंत दुर्गम भाग ओळखला जात असे ,खोपटा खाडीमुळे तालुक्याचे झालेले दोन भाग आणि सूर्यास्तानंतर किनाऱ्यावरील जाण्या-येण्याचा बंद होणारा मार्ग अश्या परिस्थितीत पाटीलपाड्यातील सन १९४१ मुख्य संस्थापक रामजी तुकाराम पाटील ,रघुनाथ पोशा पाटील ,विश्वनाथ नामा पाटील ,जनार्दन गोविंद पाटील , रामभाऊ बाळाराम भगत,दादु सावळाराम पाटील ,माजी सरपंच जगन्नाथ हसुराम पाटील व जयराम नारायण पाटील यांनी आपल्या २० सहकार्यांसह गणपत गोवऱ्या भगत यांच्या निवासस्थानी गौरा पुजनाचा पहिला सोहळा सुरू केला ,आज या उत्सवाला ७९ वर्षे पूर्ण होत आहेत .

आज मंडळाचे पहिले संस्थापक ,सदस्य कोणीही जिवंत नसतानाही या सोहळ्याच्या परंपरेचा वसा युवा वर्गाने तितक्याच ताकदीने व जोमाने पेलला आहे .

पनवेलचे दानशुर परेश शेठ डेढीया यांनी ११ वर्षापूर्वी ११ लाख रुपये खर्च करून कै.गणपत गोवऱ्या भगत यांच्या निवासस्थानाजवळ शिवमंदिराची निर्मिती केली आहे .मंदिरात शिवलिंगाच्या स्थापने बरोबरच गणपती आणि शिव-पार्वतीच्या मूर्तीचीही स्थापना करण्यात आली आहे ,मंदिरात भाद्रपदशुद्ध अष्ठमी ते द्वादशी पर्यंत हा गौरापुजन सोहळा संपन्न होतो , या पाच दिवसाच्या काळावधीत मंदिरात शिव-गौरा अभिषेक बारा वाजता मध्यान,आरती करून कार्यक्रमाचा शूभारंभ करण्यात येतो या काळात अंगात गौरा येण्याची प्रथा असल्यामुळे पहिल्या दिवशी स्त्रीयांना मंदिराच्या परिसरात प्रवेश नसतो.

गेल्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर देखावा दाखविला होता
तसेच या सोहळ्यासाठी पंचक्रोशीतील लोकच नाहीत तर उरण, पनवेल, पेण,ठाणे मुंबई तसेच संपूर्ण रायगड जिल्ह्याखेरीज महाराष्ट्रातील दुर-दुरचे लोक दर्शनासाठी येतात हा सोहळा पाहणे ,अनुभवने म्हणजे भक्तांसाठी अमृतुल्य पर्वणी. महत्त्वाचे म्हणजे इथे सर्व-धर्म समभाव अशी भावना जोपासली जाते, ह्या दिवसांत या ठिकाणी भजन,कीर्तन ,वाद्यवृद्य,गुणवंत लोक व विद्यार्थी यांचा सत्कार असे अनेक उपक्रम राबवले जातात ,पहिल्या दिवशीच्या पारायणानंतर शेवटच्या दिवशी पायात चाल बांधून बाळ्यानृत्याला फार महत्त्व आहे.

या नाचा नंतरच उत्सवाची खऱ्या अर्धाने सांगता होते ,दुसऱ्या दिवशी पारायणा नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते याचा लाभ खोपटे ग्रामस्थांसह पंचक्रोषीतील लोक व मोठ्या संखेने येणारे दूर दूरचे सर्व भाविक घेतात.

शिवकृपा गौरा मंडळ पाटीलपाडा आणि ग्रामस्त मंडळ खोपटे यांच्या कडून हा सोहळा मोठ्या उत्साह व भक्ती भावाने २६ आॕगष्ट ते ३० आॕगष्ट या काळात साजरा होत आहे.
परंतु या वर्षी पूर्ण जगावर आलेल्या कोरोना या महामारी मुळे व त्याच्या प्रादुर्भावामुळे कित्येक कार्यक्रम,दिंडी पालखी यात्रा सण यांवर सावट आले आहे असून हा सुद्धा सोहळा अगदी साधे पणाने व शासनाच्या नियमा अंतर्गत पालन करून साजरा करण्यात आला.
मात्र सामाजिक बांधिलकी म्हणून मनोरंजनाचे सर्व कार्यक्रम रद्द करून सध्याची परिस्थिती लक्षात घेता ज्याची सध्या गरज आहे म्हणून गरजू लोकांना गृहूपयोगी वस्तूंचे वाटप तसेच एम .जी.एम. रुग्णालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. त्यात डाॕ. राजेश थोरात,डाॕ.राजेश उत्तरदे, डाॕ. शारदा अंचल यांनी सोशल डिस्टंन्सीगचे काटेकोरपणे पालन करून हे शिबिर राबवले. तसेच मुसळधार पाऊस पडूनही दिवसभरात ९० रक्तदात्यांनी रक्तदान करून रा कार्यक्रमाला उत्फुर्तपणे दाद दिली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.