Press "Enter" to skip to content

महामार्गालगत विद्यार्थ्यांनी सांभाळली वाहतुकीची धुरा ; ‘वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडे येथील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबई : महामार्गालगत असलेल्या शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून राबविण्यात येत असलेल्या ‘वन डे ट्रॅफिक कॉप्स’ उपक्रमाला नावडे येथील परशुराम जोमा म्हात्रे हायस्कूलमधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे ५० आरएसपी (RSP) विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत वाहतूक व्यवस्थापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

३१ ऑगस्ट रोजी तळोजा वाहतूक शाखेच्या वतीने एनएच-४८ महामार्गालगत नावडे परिसरातील म्हात्रे हायस्कूलसमोर हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे पालन, सिग्नलचे महत्त्व, सुरक्षितपणे रस्ता ओलांडण्याची पद्धत तसेच वाहनचालकांनी पादचाऱ्यांना द्यावयाचे प्राधान्य याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी वाहतूक पोलिसांसोबत महामार्गाच्या दोन्ही बाजूंची वाहतूक सुरक्षितपणे थांबवून शाळकरी मुलांना रस्ता ओलांडून देण्याचे प्रात्यक्षिक केले. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची प्रत्यक्ष माहिती मिळण्याबरोबरच रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्याची संधीही मिळाली.

‘वाहतूक नियम प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेसाठी आहेत,’ असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. महामार्गालगतच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

पोलिस उपायुक्त डॉ. राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक चेतना चौधरी तसेच तळोजा वाहतूक शाखेतील अंमलदारांनी हा उपक्रम यशस्वीपणे राबविला.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.