

रोहा : समीर बामुगडे
रोहा : वरसे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गायरान व गुरचरण जमिनीवरील अतिक्रमणाचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाच्या आदेशांच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तहसीलदार रोहा यांनी गायरान व गुरचरण जमिनींची मोजणी करून अतिक्रमणाबाबत तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले असतानाही वरसे मंडळ अधिकारी भरत गुड यांच्याकडून अहवाल देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप पुढे आला आहे.
विविध मध्यमांमध्ये ग्रुप ग्रामपंचायतीतील भूखंड प्रकरण तसेच रोहा तालुक्यातील शासकीय जमिनी आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमणाबाबत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदार डॉ. किशोर देशमुख यांनी या प्रकरणाची दखल घेतली. १६ मार्च २०२६ रोजी गटविकास अधिकारी रोहा यांना पत्र देऊन वरसे, भुवनेश्वर, निवी, जय धाकोबा तसेच निवी ठाकुरवाडी परिसरातील गायरान व गुरचरण जमिनींची मोजणी करून अतिक्रमण हटविण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
विशेष म्हणजे, या प्रकरणी मंडळ अधिकारी रोहा व ग्राम महसूल अधिकारी भुवनेश्वर यांचा १३ मार्च रोजीचा अहवालही तहसीलदार कार्यालयाच्या पत्रात संदर्भ म्हणून नमूद करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर पुढील कार्यवाहीबाबत वरसे मंडळ अधिकारी भरत गुड यांच्याकडून अपेक्षित अहवाल सादर करण्यास टाळाटाळ होत असल्याचे बोलले जात आहे.
तहसीलदारांच्या स्पष्ट आदेशानंतरही जर संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल सादर करण्यास विलंब होत असेल, तर या विलंबामागचे कारण काय? अतिक्रमणाच्या ठिकाणी प्रत्यक्ष मोजणी झाली आहे का? झाली असल्यास त्याचा अहवाल अद्याप का सादर करण्यात आलेला नाही? तसेच शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाबाबत प्रशासनाची भूमिका नेमकी काय आहे, असे सवाल आता ग्रामस्थांकडून उपस्थित केले जात आहेत.
शासकीय जमिनींचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असताना आदेशांची अंमलबजावणीच रखडत असेल, तर सामान्य नागरिकांनी दाद मागायची कुणाकडे, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे तहसीलदारांच्या आदेशानंतर आता वरिष्ठ महसूल अधिकारी या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीने अहवाल मागवणार का आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमणावर प्रत्यक्ष कारवाई कधी होणार, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.




Be First to Comment