Press "Enter" to skip to content

चेन स्नॅचिंग व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; १२ लाखांचा मुद्देमाल जप्त, ९ गुन्हे उघड


पनवेल, दि.20 (संजय कदम) ःनवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाने चेन स्नॅचिंग व मोटारसायकल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे १२ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून ९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोदकुमार शेवाळे आणि पोलीस उपायुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांनी महिला व रस्त्यावरील गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी अशा गुन्ह्यांचा प्राधान्याने तपास करून उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.

खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्याचा तपास करताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. या तपासात रियाज रमजान शेख उर्फ रियाज आलम रमजान अली (वय ४२), जमालबादशाह मनीरुल गाझी (वय ३१) आणि आशिक बिल्ला गाझी (वय २२) यांना अटक करण्यात आली.

चौकशीत आरोपींनी नवी मुंबई, ठाणे, मुंबई व मीरा-भाईंदर परिसरातील अनेक चेन स्नॅचिंग आणि चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून एक सोन्याचे मंगळसूत्र, चार सोन्याच्या चेन, तुटलेल्या चेनचे तुकडे आणि दोन मोटारसायकली असा एकूण १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईमुळे खांदेश्वर, कामोठे, खारघर, नारपोली, पेल्हार, अंधेरी एमआयडीसी आणि समतानगर पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले एकूण ९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

अटक आरोपींपैकी रियाज शेख याच्याविरुद्ध मुंबई, विरार, तुळींज आणि माणिकपूर पोलीस ठाण्यांमध्ये यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत. तसेच जमालबादशाह गाझी याच्याविरुद्धही समतानगर, मिरारोड, कनकिया आणि नयानगर पोलीस ठाण्यांत विविध गुन्ह्यांची नोंद आहे.

सदरची उल्लेखनीय कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती कक्ष, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे, सपोनि श्रीनिवास तुंगणवार, सपोनि महेश जाधव, पोहवा संजय राणे, नितीन जगताप, सतीश चव्हाण, पोना सचिन टिके आणि अजय कदम यांनी केली आहे. या पथकाच्या सतर्क तपासामुळे आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश होऊन अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात यश आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.