नाटकांची परंपरा जपणारे रांजणपाडा गाव : महेंद्रशेठ घरत
उलवे, ता. ८ :
पूर्वीच्या काळी जत्रा म्हणजे गावोगावी आनंदोत्सव असायचा. त्याकाळी बहुतांश घरांमध्ये फक्त जत्रेलाच मटण शिजायचे. त्यामुळे गावात मटणाचा सुगंध दरवळत असे. आलेल्या प्रत्येक पाहुण्याला हक्काने जेवायला दोन घास तरी खा, असा आग्रह केला जात असे. तसेच जत्रे निमित्ताने नाटक, कव्वालीचे सामने वा इतर मनोरंजनात्मक कार्यक्रम असायचे. ही परंपरा आजही काही गावांमध्ये जपली जातेय, त्यापैकीच उरण तालुक्यातील रांजणपाडा हे गाव. मंगळवारी रांजणपाडा गावची यात्रा होती. त्यानिमित्ताने जुन्याजाणत्या हौशी कलाकारांनी स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘देव घरा आयला’ या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. त्याचे उद्घाटन आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी महेंद्रशेठ घरत म्हणाले, “हसुराम पाटील यांच्यासारखे अनेक हरहुन्नरी कलाकार ग्रामीण भागात आहेत. त्यांच्या नसानसांत नाटक भिनले आहे. त्यामुळे पूर्वीच्या काळी गावोगावी होणाऱ्या नाटकांची परंपरा ते आजही जपत आहेत. ते नवीन पिढीला सोबत घेऊन त्यांच्यात कलेचे बीज रोवत आहेत. वास्तवदर्शी नाटक सादर करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. लहान मुले, तरुण यांच्यातील कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी नाटक बसवणे आणि त्याचे उत्तम सादरीकरण करणे, हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे रांजणपाडा ग्रामस्थांचे आणि उत्तम नाटक सादर करणारे कलाकार यांचे मनापासून अभिनंदन करतो.मी कलेचा भुकेलेला आणि प्रोत्साहन देणारा आहे. मी नाटक वेडा आहे. पूर्वी मी शिवाजी मंदिरला नाटक पाहायला जायचो, आजही मला उसंत मिळाली की नाटकाचा मोह आवरत नाही. कारण नाटक ही एक जिवंत कला आहे.”
रांजणपाडा येथील ‘अष्टगंध सांस्कृतिक, कला, सामाजिक मंडळा’च्या वतीने मरूआईच्या यात्रेनिमित्त आणि बाबीबाई त्रिंबक पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मंगळवारी ( ता. ७) धनेश्वर म्हात्रे लिखित व हसुराम पाटील दिग्दर्शित तसेच प्रसाद कडू सहदिग्दर्शक असलेल्या नाटकाचा प्रयोग रांजणपाडा (उरण) येथील हनुमान मंदिराच्या पटांगणात सादर करण्यात आला. यावेळी महेंद्रशेठ घरत बोलत होते.
या नाटकाची निर्मिती रमेश चिंतामण कोळी यांची आहे. नाट्य मंडळाचे अध्यक्ष- अशोक कान्हा म्हात्रे, सचिव- दत्तात्रेय घरत, खजिनदार- प्रज्योत पाटील, सल्लागार- रंजन ठाकूर, नरेंद्र ठाकूर, पत्रकार दत्तात्रेय म्हात्रे यांच्या टीमने उत्तम कामगिरी केली आहे.
दिगंबर कोळी, मनोहर ठाकूर यांची संकल्पना आणि धनेश्वर म्हात्रे, हसुराम पाटील, कृष्णकांत म्हात्रे, दिगंबर कोळी, सुमित कुंभार, अशोक म्हात्रे, जयकिसन मोकल, वैभव म्हात्रे, प्रसाद कडू, अलंकार कडू, वैशाली मोहिते, परीशा सरोदे, व रुद्र ठाकूर आदी कलाकारांनी आपल्या अभिनयाने रसिकांना जिंकले. आनंद कुबल यांचे संगीत, राजा जोशी यांचे नेपथ्य, डी. वाय. म्हात्रे यांची रंगभूषा, संतोष साऊंड सर्विस यांची रंगमंच व्यवस्था प्रशंसनीय होती. आगरी संस्कृती, आगरी भाषेतील गोडवा, आगरी रुढी-परंपरा व नातेसंबंधांवर आधारित वास्तवदर्शी ‘देव घरा आयला’ हे नाटक रसिकांच्या मनात कायम घर करेल, अशा भावना यावेळी रसिकांनी व्यक्त केल्या.




Be First to Comment