Press "Enter" to skip to content

थँक यू अर्जेंटिना


आजच्या अग्रलेखाचे हेडिंग वाचून आमचे वाचक मित्र निश्चितच चक्रावून गेले असतील. परंतु सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये नैसर्गिक वायू आणि कच्चे तेल यांच्या आयातीला भारतासह सर्व देशांना फटका बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर अर्जंटीनाकडून अतिरिक्त एलपीजी व अन्य खनिज संसाधने मुबलकपणे मिळत असल्यामुळे या देशाचे आभार मानलेच पाहिजेत. अर्जेंटिनाचे आभार मानत असतानाच केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी अर्जेंटिना सोबत केलेल्या विशेष कराराचे देखील कौतुक करावे लागेल.
            पश्चिम आशियातील संघर्षामुळे निर्माण झालेल्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर अर्जेंटिनाने भारताला एलपीजीचा पुरवठा वाढवला आहे. गेले दोन आठवडे उरामध्ये धडकी भरविणाऱ्या बातम्या येत असतानाच अर्जेंटिना मधून येणारी बातमी निश्चितच सुखावह आहे.या देशाने २०२६ च्या पहिल्या तीन महिन्यांत भारताला ५०,००० टन एलपीजी पाठवला. प्राप्त आकड्यांचे अध्ययन केले असता गेल्यावर्षीच्या अर्जेंटिनाने केलेल्या पुरवठ्याच्या दुपटीपेक्षा जास्त पुरवठा त्यांनी केवळ एका तिमाहीतच केला आहे. २०२५ या संपूर्ण वर्षामध्ये अर्जेंटिना ने २२००० टन एलपीजी पुरवठा केला होता.युद्ध सुरू होण्यापूर्वी बाहिया ब्लान्का बंदरातून जवळपास ३९,००० टन एलपीजी पाठवण्यात आला होता, तर ५ मार्च रोजी आणखी ११,००० टनांचा माल पाठवण्यात आला.सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये अर्जेंटिनाचे नैसर्गिक वायूवर आधारित एलपीजी उत्पादन २५९,००० टन होते. २०२४ मधील २.६ दशलक्ष टनांवरून २०२५ मध्ये वार्षिक उत्पादन २.६३ दशलक्ष टनांपर्यंत वाढले.२०२४ पूर्वी अर्जेंटिनामधून भारताला एलपीजीची कोणतीही निर्यात होत नव्हती. आता हा दक्षिण अमेरिकन देश भारताच्या एलपीजी बाजारपेठेतील आपला वाटा वाढवण्यासाठी सज्ज झाला आहे.अर्जेंटिना २०२६ मध्ये आपल्या बाहिया ब्लान्का येथील प्रक्रिया प्रकल्पात एक नवीन नैसर्गिक वायू द्रव अंशांकन युनिट कार्यान्वित करण्याची योजना आखत आहे , ज्यामुळे प्रक्रिया केलेल्या उत्पादनात वाढ होईल आणि अतिरिक्त माल निर्यात बाजारपेठांसाठी उपलब्ध होईल.अर्जेंटिना दक्षिण अमेरिकेत भारतासाठी एक प्रमुख आर्थिक भागीदार म्हणून उदयास येत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत द्विपक्षीय व्यापार ३६.७७% ने वाढून ६.३४ अब्ज डॉलरवर पोहोचला. भारत हा अर्जेंटिनाचा पाचवा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आणि निर्यातीचा देश आहे.
अर्जेंटिना हा भारताला खाद्यतेलाचा, विशेषतः सोयाबीन तेलाचा, एक प्रमुख पुरवठादार आहे. इतर प्रमुख आयातींमध्ये सूर्यफूल तेल, तयार चामडे, तृणधान्ये, अवशिष्ट रसायने आणि कडधान्ये यांचा समावेश आहे. हायड्रोकार्बन्स आणि महत्त्वपूर्ण खनिजे ही देखील सहकार्याची उदयोन्मुख क्षेत्रे आहेत . तेल आणि वायू सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी फेब्रुवारी २०२३ मध्ये ओएनजीसी विदेश लिमिटेड आणि अर्जेंटिनाच्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी वायपीएफ (YPF) यांच्यात करार करण्यात आले. लिथियम संसाधनांच्या पहिल्या परदेशी अधिग्रहणामध्ये, सरकारी मालकीच्या खनिज विदेश इंडिया लिमिटेडने १५ जानेवारी २०२४ रोजी कॅटामार्का मिनरा वाय एनर्जेटिका सोसिएदाद डेल एस्टाडोसोबत अन्वेषण आणि अंतिम विकासासाठी पाच लिथियम ब्लॉक्स भाडेतत्त्वावर घेण्याचा करार केला गेला.
        आगामी काळात होणाऱ्या घडामोडींचा आडाखा बांधत गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये विविध देशांसोबत जे करार केले गेले ते किती महत्त्वपूर्ण होते हे आज लक्षात येत आहे. युद्धजन्य परिस्थिती भारतासह अन्य देशांवर लादली गेली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत काय मिळत नाही त्या उणीवांवर बोट ठेवण्यापेक्षा याही परिस्थितीत आपल्या पदरात काय पडतेय याकडे सकारात्मक दृष्ट्या पाहिले पाहिजे. याच प्रयत्नात अर्जेंटिना हा दक्षिण अमेरिकन देश, संकट परिस्थितीत ज्या ताकदीनं आपल्या देशाला पाठबळ देतोय ते पाहता नक्कीच म्हटले पाहिजे थँक्यू अर्जेंटिना….!

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.