Press "Enter" to skip to content

माजी पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

महेंद्रशेठ घरत यांचा मुंबईत ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव !

मुंबई : “रात्र वैऱ्याची आहे, जागे व्हा! प्रकाश होणारच आहे. प्रत्येक जण सक्षम आहे, पण परिस्थिती गंभीर आहे. घटना तुडविली जातेय. आयुष्यात मानसिकदृष्ट्या सक्षम नसाल तर निर्णय चुकेल. महेंद्रशेठ घरत तुम्ही गांधी-आंबेडकर यांचे विचार जगताय. समाजाचे भले करण्यासाठी धडपडताय. त्यामुळे आजच्या गांधीजींच्या नावाने दिल्या जाणाऱ्या समाजभूषण पुरस्कारासाठी तुम्ही योग्य आहात,” असे राज्याचे माजी पोलिस महासंचालक सुधाकर सुराडकर यांनी मुंबईतील प्रेस क्लबच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून रविवारी बोलताना मत व्यक्त केले. त्यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना मुंबईतील प्रेस क्लब येथे ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सदभावना समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. 

 “बाबासाहेबांनी आपल्याला विचारांची ताकद दिली. स्वाभिमानाने जगण्याचा हक्क म्हणजे घटना. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांचे विचार समजून घेऊन वाटचाल करायला हवी,” असेही  माजी महासंचालक सुधाकर सुराडकर यावेळी म्हणाले.

“मीही एकेकाळी केरोसिनच्या दिव्यावर रात्र जागून अभ्यास केलाय. कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेत शिकलो, पण त्यांचा आचारविचार जगतोय. मी जगभ्रमंती करीत असताना शिक्षण आणि आरोग्य सेवा ही तेथे सरकारचीच जबाबदारी असते, हे मी पाहतोय, पण आपल्याकडे शिक्षणात फार मोठी दरी निर्माण झालीय. आरोग्य सेवा सर्वसामान्यांना परवडत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या ताटातील अर्धी भाकरी दुसऱ्याला देण्याची दानत माझ्यात आहे. जातपात मी मानत नाही. एका मताचा अधिकार सर्वांना दिलाय तो वापरा. गांधीजींचा पुतळा जेव्हा परदेशातही पाहातो तेव्हा त्यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होतो. ३८ वर्षांचा माझा संघर्ष कमालीचा आहे. म्हणूनच आज देणाऱ्यांच्या भूमिकेत जाण्याची संधी मला मिळालीय,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत सत्काराला उत्तर देताना म्हणाले.

महाराष्ट्राचे माजी पोलिस महासंचालक डॉक्टर सुधाकर सुरडकर, राजमाता मासाहेब जिजाऊ यांचे 14 वंशज संभाजी राजे जाधवराव, फिल्म संसार बोर्डचे माजी सदस्य विलास खानोलकर, पोलिस मित्र समाजभूषण दिलीप नारद, आगरी कोळी सिने नाट्य अभिनेत्री रंजीता पाटील, रेश्मा जगताप आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

मैत्री संस्था आणि युवा सामाजिक प्रतिष्ठान यांच्यातर्फे ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सदभावना समाजभूषण’ पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. पत्रकार सूरज भोईर यांनी आणि त्यांच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.