
कोजागरीनिमित्त नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे तू नभातले तारे मैफल
कोजागरीनिमित्त भीमराव पांचाळे यांची तू नभातले तारे गज़ल मैफल
नवी मुंबई : कोजागरी पौर्णिमेचे औचित्य साधत नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने येत्या ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता, वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात मराठी-हिंदी गजलवर आधारित तू नभातले तारे… या सुरेल मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सांस्कृतिक कार्यक्रमातच कला आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे.
यावर्षी सुप्रसिद्ध सुलेखनकार अच्युत पालव यांना भारत सरकारद्वारा पद्मश्री पुरस्काराने, गज़लनवाज़ भीमराव पांचाळे यांना महाराष्ट्र शासनाने यावर्षी लता मंगेशकर पुरस्काराने व मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी यांना महाराष्ट्र शासनाने मुंबई विभागीय डॉ. एस.आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता (ग्रंथमित्र) पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे त्यांना गौरविण्यात येणार आहे.
याप्रसंगी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे, विभागीय आयुक्त कोकण विजय सुर्यवंशी, नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे विविध माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम वेळोवेळी राबविले जात असतात. त्याच उपक्रमाचा एक भाग असलेल्या कोजागरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात विविध मान्यवरांसह नवी मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून एकमेकांशी भेटी-गाठी करतात, संवाद साधतात. हा कार्यक्रम नवी मुंबईकरांसाठी एक पर्वणी ठरला असल्याचे नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला यांनी सांगितले.
सदर कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून नवी मुंबईकर रसिक श्रोत्यांनी कोजागरी निमित्त आयोजित या गज़ल मैफलीचा आस्वाद घेण्यासाठी सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन नवी मुंबई प्रेस क्लबतर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९९८७१९९८५१/९८६७०८६१२१ या क्रमांकावर संपर्क साधवा.




Be First to Comment